मुंबई, 30 जून (हिं.स.) – ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेश कुमार मीना यांची महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुजाता सौनिक सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांच्या जागी महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत असलेल्या राजेश कुमार मीना यांची मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना पदभार सांभाळण्याचे पत्र देण्यात आले आहे.
राजेश कुमार मीना यांच्यासोबतच राज्याच्या मुख्य सचिवपदासाठी गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इकबालसिंह चहल आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे देखील शर्यतीत होते. पण, प्रशासनात राजेश कुमार मीना हे सर्वांत ज्येष्ठ असल्याने राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी सरकारकडून त्यांच्या नावालाच अधिक पसंती देण्यात आली.
राजेश कुमार मीना हे राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांना कामाचा व्यापक अनुभव आहे. ते सध्या महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम करत होते. आतापर्यंत त्यांनी विविध विभागांमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. 1988 मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते आयएएस अधिकारी झाले. राजेश मीना यांनी उत्तर प्रदेश कॅडरमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. ते माजी भाजपा खासदार जसकौर मीना यांची मोठी मुलगी अर्चना मीना यांचे पती आहेत. त्यांच्या पत्नी अर्चना मीना सामाजिक क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावत आहेत. राजेश मीना यांचे वडील रामगोपाल मीना हे सवाई माधोपूर पीजी कॉलेजचे प्राचार्य राहिले आहेत.
राजेश कुमार मीना ऑगस्ट 2025 मध्ये सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे मुख्य सचिव पदासाठी त्यांच्याकडे जुलै आणि ऑगस्ट असा दोन महिन्यांचा कालावधी असणार आहे. दरम्यानच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्या, तर त्यांना मुख्य सचिव पदासाठी मुदतवाढ मिळू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. याआधी अजोय मेहता, नितीन करीर या दोन ज्येष्ठ माजी सनदी अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या काळात राज्याच्या मुख्य सचिव पदावर मुदतवाढ मिळाली होती.