नवी दिल्ली , 18 एप्रिल (हिं.स.)।रॉयल चॅलेंज बंगलोरने उबर इंडिया मोटो विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे.आरसीबीने आरोप केला आहे की उबरने त्यांच्या युट्युबच्या जाहिरातीमध्ये त्यांच्या ट्रेडमार्कचा अनादर करत संघाची आणि शहराची खिल्ली उडवण्याचा आरोप करण्यात आला आहे.या जाहिरातीमध्ये क्रिकेटर ट्रॅव्हिस हेड आहे.ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ट्रॅव्हिस हेड आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद कडून खेळत आहे.
आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने या प्रकरणात खटला दाखल केला आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की जाहिरातीत वापरल्या जाणाऱ्या भाषेमुळे त्यांच्या ब्रँडची प्रतिमा मलिन झाली आहे. आरसीबीने म्हटले आहे की असे करून त्यांनी थेट त्यांच्या ट्रेडमार्कवर हल्ला केला आहे. जाहिरातीत करण्यात आलेला हा खोडसाळपणा केवळ संघाला हिणवण्याच्या उद्देशाने केला गेला असावा, असाही दावा करण्यात आला आहे. आरसीबीच्या मते, त्यांच्या केवळ नावातच छेडछाड झाली नाही तर घोषवाक्याचीही खिल्ली उडवण्यात आली आहे. फ्रँचायझीने न्यायालयाला सांगितले की जाहिरातीत त्यांच्या आवडत्या घोषवाक्याची म्हणजेच ‘ई साला कप नामदे”चीही खिल्ली उडवण्यात आली आहे. आरसीबीच्या मते, ते घोषवाक्य संघ आणि चाहत्यांशी भावनिकदृष्ट्या जोडलेले आहे. अशा परिस्थितीत, जाहिरातीत ते व्यंग्यात्मक पद्धतीने सादर करणे म्हणजे चाहते आणि संघ दोघांच्याही भावनांची थट्टा करण्यासारखे आहे.
तर ही जाहिरात केवळ विनोदी पद्धतीने करण्यात आल्याचा युक्तिवाद उबरने केला. कंपनीच्या म्हणण्यानुसार, बेंगळुरूच्या ट्रॅफिक समस्येवर प्रकाश टाकणे आणि उबर मोटोला वेगवान पर्याय म्हणून दाखवणे हा यामागचा उद्देश होता. उबरने असा युक्तिवाद केला की जाहिरातीमध्ये थेट RCB चे ट्रेडमार्क वापरलेले नसून तो एक विनोद आहे. 13 मे रोजी होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आरसीबीला ‘रॉयली चॅलेन्ज्ड आव्हान’ देईल हे दाखवण्याचा उद्देश होता. सर्जनशील स्वातंत्र्याला अडथळा आणू नये, असे उबरने न्यायालयाला सांगितले. ही जाहिरात 10 दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली असून ती आता काढून टाकणे योग्य होणार नाही, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले.
5 एप्रिल रोजी उबरने एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात सनरायझर्स हैदराबादचा स्टार खेळाडू ट्रॅव्हिस हेड दाखवण्यात आला होता. ही जाहिरात उबेर मोटो बाइक टॅक्सी सर्व्हिसचा प्रचार करण्यासाठी होती, ज्याचे नाव ‘हैदराबादी’ मोहीम आहे. यामध्ये ट्रॅव्हिस हेडला बंगळुरूच्या स्टेडियममध्ये प्रवेश करताना दाखवण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये, हेड एका साइनबोर्डवरील मेसेज ‘बंगलोर विरुद्ध हैदराबाद’ वरून ‘रॉयली चॅलेंज्ड बेंगळुरू’ असा बदलतो. त्यानंतर सिक्युरिटीने पाहताच तो उबर मोटो बाईकवरून वेगाने पळून जातो. ही जाहिरात काही वेळातच यूट्यूबवर लोकप्रिय झाली. तर तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलही झाला.