अमरावती, 3 मे (हिं.स.)।
कामाच्या ठिकाणी महिलांचे होणारे लैंगिक शोषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महिला व बालविकास मंत्रालयाने ‘शी-बॉक्स’ (SHe-Box – Sexual Harassment electronic Box) हे ऑनलाइन तक्रार निवारण पोर्टल सुरू केले आहे. आता या पोर्टलवर सर्व खाजगी आस्थापनांना नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, २०१३ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या कायद्यानुसार, ज्या आस्थापनांमध्ये १० किंवा त्याहून अधिक कर्मचारी आहेत, तेथे अंतर्गत तक्रार निवारण समिती असणे आवश्यक आहे.आस्थापनांनीhttps://shebox.wcd.gov.in/या संकेतस्थळाला भेट देऊन ‘Private Head Office Registration’ या पर्यायावर क्लिक करावे.
त्यानंतर आवश्यक माहिती भरून आणि मागितलेली कागदपत्रे (उदा. कंपनीचा नोंदणी क्रमांक, जीएसटी क्रमांक, पॅन क्रमांक) अपलोड करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येईल. ‘शी-बॉक्स’ पोर्टलमुळे महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या तक्रारी ऑनलाइन नोंदवणे आणि त्याचा पाठपुरावा करणे सोपे होणार आहे. तसेच, प्रशासनाला या तक्रारींवर वेळेत आणि प्रभावी कार्यवाही करणे शक्य होईल. सर्व खाजगी आस्थापनांनी या निर्देशांचे पालन करून आपल्या संस्थेची ‘शी-बॉक्स’ पोर्टलवर त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.