मुंबई, ५ ऑगस्ट – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला मुंबई महापालिकेत किमान २० ते २५ जागा देण्यात याव्यात, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली. यासाठी जबाबदारी भाजपने घ्यावी, असे ते म्हणाले.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कमिटीच्या बैठकीत आठवले बोलत होते. त्यांनी सांगितले की, २०१२ साली युतीत सामील झाल्यापासून रिपब्लिकन पक्ष महायुतीचा भाग आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत रिपाइंला किमान २०–२५ जागा, जिल्हा परिषदेसाठी ५ जागा आणि पंचायत समित्यांसाठी १ जागा मिळावी.
राज्य सत्तेतही रिपब्लिकन पक्षाला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, असे आठवले यांनी सांगितले. त्यांनी राज्यात एक मंत्रीपद, एक विधान परिषद सदस्यत्व, महामंडळ पद, जिल्हा नियोजन समिती आणि एसईओ पदे देण्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या घटक पक्षांसोबत संयुक्त बैठक घेऊन जागावाटप निश्चित करावे, असेही ते म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असे सांगत त्यांनी दावा केला की मराठी मते रिपब्लिकन पक्षासोबतही आहेत. त्यामुळे महायुतीच मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.