मुंबई, 13 सप्टेंबर। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौर पद निश्चित मिळेल. रिपब्लिकन पक्षाला उत्तर मुंबई जिल्ह्यात किमान 7 जागा आणि संपूर्ण मुंबईत किमान 24 जागा महायुतीने सोडाव्यात असा भाजपकडे रिपब्लिकन पक्षाचा प्रस्ताव देण्यात यावा. त्यामुळे मुंबई महापालिकेवर महायुतीची सत्ता आणण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
मुंबई जिल्हानिहाय कार्यकर्ता मेळावे घेऊन आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाची मोर्चेबांधणीला रामदास आठवले यांनी सुरुवात केली आहे. कांदिवली पश्चिम येथील रघुलीला मॉलमधील जस्मिन बँकवेट हॉलमध्ये आयोजित रिपब्लिकन पक्षाच्या उत्तर मुंबई जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
आठवले म्हणाले, “काँग्रेस पक्ष हा डिव्हाईड अँड रुलची पॉलिसी राबवून समाजात फूट पाडत आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान सर्वश्रेष्ठ आहे. संविधान बदलणार असा खोटा प्रचार करून समाजात फूट दाण्याचे पाप काँग्रेस करीत आहे.”
त्यांनी यावेळी स्पष्ट केले की, “रिपब्लिकन पक्ष स्वतंत्र अस्तित्व असणारा पक्ष आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा राष्ट्रीय स्तरावर घटक पक्ष आहे आणि राज्यात महायुतीचा घटक पक्ष आहे. दलित-बहुजनांच्या आशीर्वादामुळे रिपब्लिकन पक्ष देशभर वाढत आहे.”
त्यांनी उदाहरण दिले की, “नागालँडमध्ये रिपब्लिकन पक्षाचे दोन आमदार निवडून आलेले आहेत. मणिपूरमध्ये रिपब्लिकन पक्षाला 17 टक्के मतदान मिळाले आहे. आणखी दोन राज्यात मान्यता मिळाली तर रिपब्लिकन पक्षाला निवडणूक आयोगाची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळेल.”