वर्धा, 29 जुलै – सामान्य नागरिकांच्या समस्या थेट ऐकण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले निवेदने सादर केली.
महसूलमंत्र्यांनी प्रत्येक नागरिकाचे म्हणणे स्वतः ऐकून घेतले व संबंधित अधिकाऱ्यांना कालमर्यादेत कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि विभागप्रमुख सहभागी झाले होते.
महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, “नागरिकांच्या समस्या स्थानिक स्तरावरच सोडवणूक होणे गरजेचे आहे. तालुकास्तरावर लोकशाही दिन नियमित घेण्यात आल्यास अनेक तक्रारी तिथेच निकाली काढता येतील.” तसेच, शासनस्तरावरील तक्रारींसाठी मंत्रालयात स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी अलार्म सिस्टीम बसवण्याचा प्रस्तावही तत्काळ सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.
पालकमंत्री डॉ. भोयर यांनी वर्धा शहरातील सानेनगर व रामनगर येथील नागरी समस्यांवर स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यांनी गजानन नगर, पिपरी मेघे येथील नागरिकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख करत त्या परिसरातील नागरिकांना भुखंडांचे वाटप महसूलमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आल्याचे सांगितले.
कार्यक्रमात वनहक्क पट्टे, नझूल भूखंड, जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत सातबारा उतारे इत्यादींचे वाटप करण्यात आले.
महसूलमंत्री बावनकुळे यांनी सुरुवातीलाच, “सर्व नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय मी येथेून हलणार नाही,” अशी भूमिका घेतली होती आणि त्यांनी त्या प्रमाणे नागरिकांची समस्या ऐकून घेतल्या.