नांदेड, २९ ऑगस्ट. नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने सर्व भागांना झोडपणे सुरू केले. नांदेड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असून नदी नाले ओढे भरून वाहत आहेत. यातच प्रशासनाने बचाव कार्य देखील सुरू केले आहे.
नागरिकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करण्यात येत असून पूर परिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने बाहेर काढण्यात आले आहे.
मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने विस्कटलेली घडी बसते न बसते, पुन्हा बुधवारी, गुरुवारी रात्रीपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील १७ मंडळांत अतिवृष्टी झाली असून, सर्वाधिक ११५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
बिलोली, मुखेड, कंधार आणि नायगाव तालुक्यातील अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढले आहे.
गोदावरी, मानार, मांजरा आणि लेंडी नद्या दुथडी भरून वाहत असून, त्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. अनेक गावांचे रस्ते बंद झाले आहेत.
