नवी दिल्ली, 23 जून (हिं.स.) : टीम इंडियाचा एकदिवसीय क्रिकेटचा कर्णधार रोहित
शर्माला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करुन १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. २३
जून २००७ रोजी त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आयर्लंडविरुद्ध भारतासाठी पदार्पणाचा
सामना खेळला होता. रोहितने सोशल मीडियावर या निमित्त्ताने एक भावूक पोस्ट केली आहे.
रोहित शर्माने आपल्या १८ वर्षांच्या सोनेरी
कारकीर्दीमध्ये भारतीय संघाला टी-२० विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं अजिंक्यपद
पटाकवून दिलं आहे. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली
होती. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्याने रोहित शर्माचं एकदिवसीय
विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न साकार झालं नाही. रोहितने आंतरराषट्रीय क्रिकेटमध्ये
तिन्ही फॉरमॅटमध्ये १९ हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. त्याचप्रमाणे एकदिवसी
क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकाव्याचा विक्रमही रोहित शर्माच्या नावावरच आहे.
टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारापैकी एक
असलेल्या रोहितने कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता तो केवळ
एकदिवसीय क्रिकेट खेळणार आहे. २०२७ चा विश्वचषक
खेळत भारताला विजेतेपद मिळवून देण्याचं त्याचं स्वप्न आहे.