कीव, ०७ सप्टेंबर : रशियाने युक्रेनची राजधानी कीववर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला आहे. शनिवारी रात्री उशिरा ते रविवार सकाळपर्यंत ८०५ ड्रोन आणि १३ क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यांमध्ये ३ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. रशियन हल्ल्यात युक्रेनियन सरकारच्या मुख्य इमारतींनाही लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सर्व इमारतींमध्ये अग्निशमन दलाचे जवान आग विझवताना दिसले आणि संपूर्ण शहरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
रशियन सैन्याने दावा केला आहे की, युक्रेनच्या हवाई संरक्षण प्रणालींनी ७५१ लक्ष्यांना रोखले किंवा निष्क्रिय केले. पण क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने देशभरात ३७ ठिकाणी हल्ला करण्यात आला. अनेक ठिकाणी आग लागली. या हल्ल्यांमध्ये अनेक निवासी आणि प्रशासकीय इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून सरकारी मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात कॅबिनेट इमारतीला आग लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.
युक्रेनियन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, रशियाकडून रात्रभर असे हल्ले सुरू राहिले. हे हल्ले ड्रोनने सुरू झाले होते. ज्याचे रूपांतर क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये झाले. रशियाने केलेल्या या हल्ल्यांदरम्यान प्रचंड दहशत आणि गोंधळाची परिस्थिती दिसून आली. देशभरात हवाई सतर्कतेचा इशारा देण्यात आला आणि नागरिकांना ताबडतोब सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले. अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि मदत पथके क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे लागलेली आग विझवताना दिसले.
रशियाने युक्रेनवर केलेला हा हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा सुमारे तीन वर्षांपासून सुरू असलेले हे युद्ध थांबवण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही दोन्ही बाजूंमधील शांतता चर्चेचा दावा केला होता. पण सध्याच्या हल्ल्यांवरून असे दिसून येते की, शांतता चर्चेत कोणतीही प्रगती झालेली नाही.