कीव, २८ ऑगस्ट. रशियाने गुरुवारी (२८ ऑगस्ट) रोजी सकाळी युक्रेनवर मिसाईल आणि ड्रोनद्वारे हल्ला केला, ज्यात ४ मुलांसह एकूण १५ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले की, हा युद्ध संपवण्यासाठी सुरू असलेल्या राजनैतिक प्रयत्नांमध्ये रशियाचा ‘उत्तर’ आहे.या हल्ल्यात युरोपियन संघ मिशनचे मुख्यालय, ब्रिटिश कौन्सिलसह सात जिल्ह्यांतील इमारतींना नुकसान झाले आहे.
युक्रेनच्या लष्कराने सांगितले की, रशियाने देशभरात एकूण ६०० ड्रोन पाठवले होते, त्यापैकी ५६३ ड्रोन आणि ३१ मिसाईल्सपैकी २६ मिसाईल्स युक्रेनच्या हवाई संरक्षण प्रणालीने निष्क्रिय केल्या. अहवालानुसार, हल्ला झालेल्या ठिकाणी मदतकार्य पथक दाखल झाले, जिथे एक इमारत पूर्णपणे कोसळली होती. त्या ढिगाऱ्याखालून २ मृतदेह सापडले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रशियाच्या या तासन्तास चाललेल्या हल्ल्यात युक्रेनचे किमान ३८ नागरिक जखमी झाले आहेत. युक्रेनच्या लष्करानुसार, रशियाने एकूण १३ ठिकाणी हल्ले केले. युक्रेनच्या राष्ट्रीय ग्रिड ऑपरेटर “उक्रेनेर्गो” ने सांगितले की, ऊर्जेसंबंधी सुविधांना मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यावर झेलेन्स्की यांनी सोशल मिडियावर ‘एक्स’ या प्लॅटफॉर्मवर लिहिले, “रशिया चर्चेच्या टेबलवर बसण्याऐवजी बॅलिस्टिक मिसाईल्स निवडतो. तो युद्ध संपवण्याऐवजी हत्या सुरू ठेवण्याचा निर्णय घेतो
” दुसरीकडे, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की त्यांनी लष्करी औद्योगिक केंद्रे आणि विमानतळांवर हल्ला केला होता. रशिया नेहमीच नागरिकांना लक्ष्य केल्याचे आरोप फेटवत आला आहे, परंतु अलीकडील काळात दाट लोकवस्तीच्या भागांवर हल्ले करून अनेकांचे प्राण घेतले गेले आहेत. या हल्ल्यादरम्यान रात्रीच्या वेळी कीव शहरात धुराचे लोट आणि स्फोटांचे आवाज ऐकायला आले. कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी सांगितले की, “ही हल्ल्यांची मालिका गेल्या अनेक महिन्यांतील सर्वात मोठी होती.” त्यांनी असेही नमूद केले की,
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्यात अलास्कामधील बैठक झाली तरी काही ठोस परिणाम दिसून आलेले नाहीत. युरोपीय परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांनी ‘एक्स’वर लिहिले, “युक्रेनवर रशियाने केलेल्या घातक मिसाईल हल्ल्यांची आणखी एक रात्र पाहून मी हादरलो आहे. माझ्या संवेदना युक्रेनमधील पीडित नागरिक आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबर आहेत, ज्यांची इमारत या हल्ल्यांत उद्ध्वस्त झाली आहे. युरोपीय संघ या गोष्टींना घाबरणार नाही.” ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी देखील या हल्ल्याची निंदा करत लिहिले, “माझ्या संवेदना कीवमधील सर्व प्रभावित नागरिकांसोबत आहेत. या हल्ल्यात ब्रिटिश कौन्सिलची इमारतही बाधित झाली आहे. पुतिन मुलांचा आणि सामान्य नागरिकांचा खून करत आहेत आणि शांततेच्या आशांवर पाणी फेरत आहेत.”
