वॉशिंग्टन, 19 ऑगस्ट – रशिया आणि युक्रेन यांच्यात लवकरच शांतता करार होऊ शकतो, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. १८ ऑगस्ट रोजी त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत युरोपमधील अनेक नेते सहभागी झाले होते.
ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर लिहिले की, “युक्रेनला युरोपियन देशांकडून सुरक्षा हमी दिली जाईल.” त्यांनी पुढे सांगितले की, झेलेन्स्की, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब, इटलीच्या पंतप्रधान जिओर्जिया मेलोनी, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर, जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज, युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन आणि नाटो महासचिव मार्क रूट यांच्यासोबत चर्चा झाली.
बैठकीनंतर ट्रम्प यांनी पुतिन यांच्याशी फोनवर बोलल्याचे सांगितले. लवकरच पुतिन आणि झेलेन्स्की यांची बैठक आयोजित होणार असून त्यानंतर दुसरी बैठक होईल, ज्यात ते स्वतः सहभागी होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ट्रम्प म्हणाले की, जवळपास चार वर्षांपासून सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरेल. या प्रक्रियेसाठी उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस, परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ आणि विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ समन्वय साधत आहेत.
