मॉस्को, 24 जुलै – रशियाचे एक प्रवासी विमान, ज्यामध्ये ५० जण प्रवास करत होते, ते बेपत्ता झाले आहे. हे विमान रशिया आणि चीनच्या सीमेवर असलेल्या अमूर प्रदेशात उड्डाण करत असताना हवाई वाहतूक नियंत्रणाशी त्याचा संपर्क तुटला, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.
ही घटना सायबेरियामधील अंगारा एअरलाइन्सच्या विमानाची आहे. हे विमान अमूर प्रदेशातील टिंडा शहराकडे जात होते. विमानात ५ मुलांसह एकूण ४३ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते. स्थानिक गव्हर्नर वसिली ऑर्लोव्ह यांनी टेलिग्रामवर पोस्ट करत सांगितले की, विमानाचा शोध सुरू करण्यात आला आहे.
जेव्हा संपर्क तुटला, तेव्हा विमान टिंडा विमानतळाच्या काही किलोमीटर अंतरावर होते. त्यामुळे प्रशासनाने तातडीने शोध मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. बचाव पथके घनदाट जंगल आणि डोंगराळ भागात रवाना करण्यात आली आहेत.
विमानाने क्रॅश लँडिंग केले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अमूर प्रदेशात हवामान अतिशय प्रतिकूल असून, येथे तीव्र थंडी, दाट जंगले, खडकाळ डोंगर आणि हवामानातील अचानक बदल ही मोठी आव्हाने आहेत. त्यामुळे या भागातून विमान उडवणे हे वैमानिकांसाठी अत्यंत कठीण कार्य मानले जाते.