मुंबई : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळली होती. याप्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. अटकेपूर्वी तब्बल 13 तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीन स्फोटकाच्या कांड्या आढळल्या होत्या. या प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे.
आज सकाळी 11 वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरु होती. जवळपास 13 तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली. उद्या (14 मार्च) सकाळी 11 च्या सुमारास त्यांना कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.
जिलेटीन च्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ गाडी 25 फेब्रुवारी रोजी पोलिसांना आढळली होती. ही स्कॉर्पिओ गाडी ज्यांच्या ताब्यात होती ते मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातील रेती बंदर इथे आढळला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यानंतर हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी NIA ला दिलेल्या जबाबात सचिन वाझे यांच्यावर हत्येचा आरोप केला होता. त्यानंतर सचिन वाझे यांच्या भोवतीचे संशयाचे वर्तुळ आणखी गडद झाले होते. आता त्यांना अटक झाल्याने या प्रकरणाला आणखी गंभीर वळण लागले आहे.
महाराष्ट्र पोलीस दलात सचिन वाझे सहाय्यक पोलीस निरीक्षक, म्हणजेच असिस्टंट पोलीस इंनस्पेक्टर (API) पदावर कार्यरत होते.
मुंबई क्राइम ब्रांचच्या ‘क्राइम इंटेलिजन्स युनिट’ चे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. मुंबईत घडणाऱ्या गुन्हेगारी कारवायांची गोपनीय माहिती मिळवून, त्या रोखण्याचं काम क्राइम ब्रांचच्या या युनिटकडे आहे. अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामींच्या अटकेमागे वाझेंची महत्त्वपूर्ण भूमिका होती. अर्णब गोस्वामींच्या कथित TRP घोटाळ्याचा तपास सचिन वाझे करत होते. या प्रकरणात बार्कचे माजी प्रमुख पार्थो दासगुप्ता यांना अटक करण्यात आली होती. अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना रनौत यांच्या ई-मेल प्रकरणाची चौकशी वाझेंचं युनिट करत होतं.
पोलिसांच्या माहितीनुसार, मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत 50-60 फूट आत मातीत रूतला होता. क्रेनच्या मदतीने मृतदेह काढण्यात आला. मृतदेहावर खूप माती लागली होती. शरीरात पाणी आणि माती गेल्याचा संशय आहे. मृतदेहाच्या चेहऱ्यावर कानटोपीसारखं मास्क होतं. त्यात 3-4 रुमाल होते. हे रुमाल पोलिसांनी जप्त केले आहेत.
– लावण्यात आलेले सहा कलमं
मुकेश अंबानींच्या बंगल्यासमोर स्फोटक प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना NIA ने अट केलीय.
*भारतीय दंड संहिता कलम 286 – जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने स्फोटकं बाळगणे.
*कलम 465 – बनावट गोष्टी करणे.
*कलम 473 – दिशाभूल करण्यासाठी बनावट कृती.
*कलम 506(2) – दहशत निर्माण करणं, धमकी देणे.
*कलम 120 B- गुन्हेगारी षडयंत्रात सहभाग घेणे.
*स्फोटक पदार्थ कायदा 1908 कलम 4 अ, ब – स्फोटकं बाळगणे.