उस्मानाबाद : परंडा तालुक्यातील सोनारी येथील जवान सागर पद्माकर तोडकरी यांना पठाणकोटमध्ये वीरमरण आलं आहे. शहीद सागर तोडकरी हे ब्रिगेड ऑफ गार्ड, 15 गार्ड पठाणकोट, पंजाब इथे भारतीय सैन्य दलात नाईक पदावर कार्यरत होते. कर्तव्य बजावताना सागर तोडकरी यांना वीरमरण आलं. सागर तोडकरी यांच्या अकाली जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण सोनारी गाव आणि परंडा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शहीद सागर तोडकरी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसं ट्वीट अनिल देशमुख यांनी केलंय. भारतमातेच्या या वीर सुपुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत, अशा भावना देशमुख यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सागर हे 2010 साली सैन्य दलात भरती झाले होते. त्यांची ट्रेनिंग नागपूरच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये झाली होती. 2015 मध्ये सागर यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांनी दोन्ही मुले लहान आहे. मुलगा 4 वर्षाचा तर मुलगी अवघ्या 2 वर्षांची आहे. अवघ्या 4 महिन्यांपूर्वीच ते आपली पत्नी आणि मुलांना घेऊन पठाणकोटला गेले होते. पण सोमवारी पठाणकोट इथं कर्तव्य बजावत असताना ते शहीद झाले.
सागर तोडकरी यांचं पार्थिव मंगळवारी सकाळी 11 वाजता पुणे विमानतळावर आणण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास त्यांचं पार्थिव सोनारी या त्यांच्या मूळ गावी दाखल होईल. त्यानंतर रात्रीपर्यंत त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार पार पडतील.
