मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेत सुरू असलेल्या वादावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही प्रतिक्रिया व्यक्त करतानाच पवार यांनी कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करणाऱ्या मुंबई महापालिकेला कानपिचक्याही दिल्या आहेत.
शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. कंगनाचं कार्यालय अधिकृत आहे की अनधिकृत हे मला माहीत नाही. मुंबई पालिकेचे स्वत:चे कायदे आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यानुसार पालिका काम करते. पण अशा परिस्थितीत कारवाई केल्याने लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी पालिकेला कानपिचक्या दिल्या आहेत.
मुंबईत राहणारे आणि मुंबई बाहेरच्यांनाही मुंबई पोलीस आणि त्यांचं कर्तृत्व माहीत आहे. मुंबई पोलिसांचा अनुभवही आहे. त्यामुळे मुंबईची तुलना कोणी पाकिस्तानशी केली तर ते फार गांभीर्याने घेऊ नये, असं सांगतानाच अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्यांना आपण अधिक महत्त्व देतोय. अशा व्यक्तींना अधिक महत्त्व दिल्याने जनमानसावर काय परिणाम होतो, हे सुद्धा पाहिलं पाहिजे, असं पवार म्हणाले.
* शरद पवारांना सात धमकीचे फोन
शरद पवार यांना धमक्यांचे फोन आले होते. त्याबाबत त्यांना विचारले असता पवार यांनी त्यांना धमक्या आलेल्या कॉल रेकॉर्ड्सचा एक कागदच पत्रकार परिषदेत दाखवला. मला धमक्यांचे सात फोन आले आहेत. यापूर्वीही अनेकदा धमक्यांचे फोन आले होते. अशा धमक्यांना मी गांभीर्याने घेत नाही, असं पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.