, २५ जुलै – लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे यांच्या वतीने “साहित्यरत्न जीवन गौरव पुरस्कार २०२५” जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा सन्मान ज्येष्ठ साहित्यिक, लेखक आणि पत्रकार अरुण खोरे यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
हा पुरस्कार १ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता सम्यक विहार विकास केंद्र, बोपोडी, पुणे येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान केला जाईल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. विजय खरे भूषवतील, तर पुरस्कार वितरण ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील.
पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, शाल, मानपत्र आणि रोख रुपये ११,००० असे आहे.
याआधीही समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते, परिवर्तनवादी नेते, साहित्यिक आणि प्रशासनातील अधिकारी यांना गौरवण्यात आले आहे. यामध्ये अंकल सोनवणे, रमेश राक्षे, प्रा. सुकुमार कांबळे, शाहीर दीनानाथ साठे, वाल्मीक अवघडे, दत्ता शेंडगे, सदाशिव वाघमारे, वसंत वाघमारे, श्रीमती शुभा अंगीर आणि दिवंगत विनायक जाधव यांचा समावेश आहे.
ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे गेली ४७ वर्षे लेखन, संपादन आणि पत्रकारितेत कार्यरत आहेत. त्यांनी सकाळ, लोकमत, पुढारी, प्रभात यांसारख्या प्रमुख दैनिकांमध्ये संपादक म्हणून जबाबदाऱ्या पार पाडल्या असून, लोकसत्ता आणि पुण्यनगरीमध्येही महत्वाची भूमिका बजावली आहे.
त्यांचे आत्मचरित्र पोरके दिवस लोकप्रिय ठरले असून दोन युरोप, इंदिरा प्रियदर्शिनी, मुद्रित माध्यमांसाठी लेखन कौशल्ये यांसारखी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी सामाजिक प्रश्नांवर विशेषतः वंचित, दलित, अपंग आणि कष्टकरी महिलांच्या विषयांवर लेखन केले आहे. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण आणि दलित आत्मचरित्रे यांचा अभ्यास करून त्यांनी विस्तृत लेखन आणि संपादन केले आहे.
त्यांनी संपादित केलेल्या विशेषांकांमध्ये गांधीजींची पुनर्भेट, महाड सत्याग्रह – ९० वे स्मरणवर्ष, महाराष्ट्र – विकासाचे नवे प्रवाह, लोकशाहीला बळ देणाऱ्या विचारधारा, दलित उद्योजकता, महात्मा फुले–डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मरण अंक आदींचा समावेश आहे.
अरुण खोरे यांच्या दीर्घ साहित्यिक आणि पत्रकारितेतील योगदानाला मिळणारा हा पुरस्कार ही एक मोठी सन्मानाची बाब मानली जात आहे.
