अमरावती, 30 एप्रिल (हिं.स.)
अखिल विश्वाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा त्यांची जन्मभूमी असलेल्या यावली शहीद येथे बुधवार (दि. ३०) पहाटे साडेपाच वाजता पार पडला. या वेळी हजारो गुरुदेव भक्तांनी उपस्थिती लावली होती.
पहाटे चारपासून भजनाने जन्मोत्सवाला प्रारंभ झाला. साडेपाच वाजता त्यांचा पाळणा. मागील सप्ताह भरापासून सुरू असलेल्या महोत्सवाची आज सांगता झाली. या प्रसंगी खासदार बळवंत वानखडे आमदार राजेश वानखडे , यांच्यासह गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. या निमित्त रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान आदी सामाजिक उपक्रमांसह विविध प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने गावातील प्रत्येक घरासमोर आकर्षक रांगोळी तसेच पणत्यांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. जन्मोत्सवानंतर सामुदायिक ध्यान करण्यात आले. त्यानंतर बाहेरगावहून आलेल्या पालख्यांची पदयात्रा देखील यावली शहीद या गावातून काढण्यात आली होती.
दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी गुरुदेव भक्तांनी मोठ्या संख्येने या ग्राम जयंती कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
महासमाधी फुलांनी सजली
गुरुकुंज मोझरी स्थित तुकडोजी महाराज यांची महासमाधी फुलांनी सजवण्यात आली होती. अनेक गुरुदेवभक्तांनी तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर समाज माध्यमांतून प्रकाश टाकला. मानवता फाउंडेशन (गुरुकुंज मोझरी) व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंचच्या सदस्यांनीही घरी राहून ग्रामजयंती साजरी केली.