ठाणे, 30 जुलै – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव केवळ ‘संभाजी’ या एकेरी स्वरूपात वापरणे, हे शिवप्रेमींच्या अस्मितेला धक्का देणारे आहे. त्यामुळे ‘संभाजी ब्रिगेड’ या संघटनेने आपल्या नावात बदल करून ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड’ असे करण्याची मागणी शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक दीपक अण्णा काटे यांनी केली आहे. ही मागणी न मानल्यास राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.
ठाण्यातील टीप टॉप सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत मार्गदर्शक म्हणून बोलताना काटे म्हणाले, “हा मुद्दा केवळ नावापुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंधित आहे. संभाजी महाराज आमच्या हृदयात आहेत. त्यांचं नाव संपूर्ण सन्मानाने उच्चारलं गेलं पाहिजे. त्यामुळे ‘संभाजी ब्रिगेड’ने आपल्या नावात बदल केला पाहिजे.”
शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले की, यापूर्वीदेखील अनेक वेळा ही मागणी करण्यात आली होती. मात्र ती वारंवार दुर्लक्षित झाल्यामुळे शिवभक्तांमध्ये असंतोष वाढत चालला आहे. “इतिहासाच्या पटलावर अमर असलेल्या महाराजांच्या नावावर फक्त ‘संभाजी’ असे थांबणे, हे शिवप्रेमींसाठी असह्य आहे,” असेही संस्थेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
काटे म्हणाले, “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे रक्षक होते. त्यांच्या बलिदानामुळेच आपण आज अभिमानाने उभे आहोत. त्यांच्या नावाशी तडजोड स्वीकारली जाणार नाही. या विषयाकडे काहीजण राजकीय फायद्याच्या दृष्टीने पाहत आहेत, ही चिंतेची बाब आहे.”
या वादाला आणखी ऊत मिळाल्याचे एका घटनेवरून स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात ‘संभाजी ब्रिगेड’चे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या तोंडावर काही शंभूभक्तांनी काळं फासल्याची घटना घडली होती. त्यानंतर शिवधर्म फाउंडेशनने आंदोलनाची रणनिती आखण्याचा निर्णय घेतला आहे.
काटे पुढे म्हणाले, “ही आमची शेवटची चेतावणी आहे. जर ‘संभाजी ब्रिगेड’ने लवकरात लवकर आपलं नाव बदललं नाही, तर महाराष्ट्रभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यास त्याची जबाबदारी त्या संघटनेवरच असेल. शिवप्रेमींच्या भावना गृहित धरू नयेत.”
पार्श्वभूमीतील घटना
शिवधर्म फाउंडेशनच्या पत्रकार परिषदेला दीपक अण्णा काटे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळताच, ‘संभाजी ब्रिगेड’च्या काही कार्यकर्त्यांनी ठाण्यात निदर्शन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, ‘संभाजी ब्रिगेड’ने नावात बदल करावा यासाठी धर्मादाय आयुक्त आणि निवडणूक आयोगाकडे लेखी मागणी करण्यात येणार असल्याची माहितीही फाउंडेशनने दिली.