प्रस्तावना : वैश्विक इतिहासात अनेक संस्कृती उदयाला आल्या आणि लोप पावल्या. उदा. इजिप्शियन, ग्रीक, रोमन, संस्कृती आदी; पण राजकीय संघर्ष, परकीय आक्रमणे, नैसर्गिक आपत्ती आदी संकटांना तोंड देत एकच संस्कृती टिकून राहिली, ती म्हणजे ‘सनातन संस्कृती’ ! सनातन म्हणजे शाश्वत, चिरंतन टिकणारे, तरीही नित्यनूतन असणारे तत्त्व ! सनातन धर्माने नेहमीच विश्वकल्याणाची संकल्पना मांडली आहे. सनातन धर्म हाच भारताचा प्राण आहे. जोपर्यंत सनातन धर्माचे अनुसरण होत होते, तोपर्यंत भारत वैभवाच्या शिखरावर होता; पण गेल्या काही दशकांमध्ये सनातन धर्माकडे हेतुपुरस्सर हेटाळणीच्या रूपात पाहिले गेले. परिणामस्वरूप अनेक कौटुंबिक, मानसिक, सामाजिक, धार्मिक, तसेच राष्ट्रीय संकटे निर्माण झाली. आज आंतरराष्ट्रीय अनुदानावर पोसल्या जात असलेल्या अनेक व्यक्ती, तसेच संघटना सनातन धर्म संपवण्याचा विडा उचलून कार्यरत झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सनातन धर्माच्या रक्षणासाठी देव, देश, धर्म यांची सेवा करणार्या व्यक्ती, संस्था, तसेच संघटना यांचे संघटन आणि जागरण होणे आवश्यक आहे. सनातन धर्माच्या बळकटीकरणातूनच रामराज्यासम तेजस्वी राष्ट्राचे निर्माण शक्य आहे. त्यासाठीच गोवा येथे १७ ते १९ मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सनातन राष्ट्राची संकल्पना : सनातन सिद्धांत हे मूलतः कल्याणकारी, व्यक्तीची ऐहिक-पारमार्थिक उन्नती साधणारे, तसेच सर्वसमावेशक आहेत. ते कुठल्याही व्यक्तीसमुहापुरते संकुचित नसून अखिल मानवजातीसाठीच लागू आहेत. सनातन तत्त्वे ही न्याय, समानता, नीती, योग, साधना आदींवर आधारित आहेत. वेद, उपनिषदे, गीता, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी आदी सनातन धर्मग्रंथांमध्ये याविषयीचे तत्त्वज्ञान आहे. सनातन राष्ट्र हे या तत्त्वांवर चालणारे एक आदर्श कल्याणकारी राष्ट्र असेल. थोडक्यात, त्रेतायुगातील रामराज्याचे कलियुगातील स्वरूप म्हणजे ‘सनातन राष्ट्र’ असे म्हणता येईल.
सद्यस्थिती आणि धर्माचे अधिष्ठान असण्याचे महत्त्व : सध्याच्या धर्मनिरपेक्ष व्यवस्थेत गो, गंगा, गीता, तुळस, मठ-मंदिरे आदी सनातन मानबिंदूंवर सातत्याने आघात होत आहेत. आधुनिकता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांच्या नावाखाली सनातन श्रद्धास्थानांचे हनन केले जात आहे. हिंदूंच्या धार्मिक परंपरा, आचार यांना अंधश्रद्धेचे ‘लेबल’ लावले जात आहे. वैदिक विज्ञानाला छद्म विज्ञान म्हणजे pseudo sciece असे म्हणत टीका केली जात आहे. कौटुंबिक स्तरावर पहायला गेले, तर देवीस्वरूप मानली गेलेली महिला सुरक्षित नाही. कुटुंबामध्येसुद्धा एकमेकांमधील आपुलकी, जिव्हाळा कमी झाला असून व्यक्ती भौतिकदृष्ट्या संपन्न झाल्या असल्या, तरी मानसिकदृष्ट्या दुर्बल झाल्या आहेत; माणसांची संकटांना सामोरे जाण्याची क्षमता उणावली आहे, असे पहायला मिळते. या सगळ्या परिस्थितीचे मुख्य कारण म्हणजे धर्माचरण आणि साधना-उपासना यांच्या बळाचा अभाव ! धर्माचे अधिष्ठान असेल, तरच व्यक्तीची, पर्यायाने समाजाची आणि राष्ट्राची उन्नती होते. धर्मविहीन भारत म्हणजे केवळ भूगोल असून भारताच्या गौरवशाली इतिहासाची परंपरा भविष्यातही चालवायची असेल, तर धर्माचे रक्षण होणे आवश्यक आहे.
सनातन राष्ट्राची आवश्यकता : आज धर्मावरील आघातांच्या विरोधात जागृती होऊन धर्मरक्षणार्थ चळवळी होत असल्या, तरी हिंदुत्वावर होत असलेले आघात पूर्णपणे थांबले नाहीत. ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’सारख्या काळ्या कायद्यांनी परकीय आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्निर्माणाचा मार्ग अडवला आहे. नुकत्याच पारित झालेल्या सुधारित वक्फ कायद्यामुळे वक्फ बोर्डाच्या मनमानीला काही प्रमाणात आळा बसला असला, तरी या कायद्याची प्रत्यक्ष कार्यवाही होऊन धर्मांधांकडून अवैधरित्या बळकावल्या गेलेल्या जमिनी मोकळा श्वास कधी घेतील, हे येणारा काळच सांगेल. आज घुसखोरीच्या गंभीर संकटामुळे अनेक प्रदेश भारतापासून वेगळे होण्याच्या मार्गावर आहेत. वर्तमान व्यवस्थेत धर्म आणि राष्ट्र यांवरील आघात सक्षमपणे परतवले जात नसल्याने सनातन राष्ट्राची आवश्यकता आहे. देशाचा विकास केवळ जीडीपी किंवा टेक्नोलॉजी यांमुळे होत नाही, तर तो धर्मामुळे होतो (धर्मेण जयति राष्ट्रम्); म्हणूनच भारतीय संस्कृतीत सोन्याच्या लंकेची नाही, तर श्रीरामाच्या रामराज्याची पूजा केली जाते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा दूरदर्शीपणा : आज ‘सनातन’ हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चिला जात असून हिंदु राष्ट्राच्या मागणीनेही जोर धरला आहे. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी तब्बल २७ वर्षांपूर्वी म्हणजे ज्या काळी सनातन हा शब्द सोडा; हिंदु हा शब्द उच्चारणेही धाडसाचे ठरवले जायचे, अशा काळी ईश्वरी राज्याची स्थापना हा ग्रंथ लिहून अध्यात्मावर आधारित राष्ट्ररचना ही संकल्पना मांडली. संतांचे द्रष्टेपणा यातून दिसून येते. आतापर्यंत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी धर्म, अध्यात्म, साधना आदींविषयी ३८० हून अधिक ग्रंथ संकलित केले असून भारतीय संस्कृतीतील कला-विद्या यांच्या पुनरुज्जीवनासाठी अनेक उपक्रम चालू केले आहेत. हिंदुत्वावरील आघात सर्वदूर पोहोचवण्यासाठी त्यांनी ‘सनातन प्रभात’ हे प्रखर हिंदुत्वनिष्ठ नियतकालिक चालू केले. त्यांच्या प्रेरणेने हिंदुऐक्याच्या दृष्टीनेही अनेक चळवळी राबवल्या जात आहेत. या कार्याचा अल्पावधीत देश-विदेशात झालेला विस्तार ही त्यांच्या दैवी कार्याचीच साक्ष आहे.
सनातन राष्ट्र शंखनाद : सनातन संस्थेचा रौप्यमहोत्सव आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव यांनिमित्त आयोजित केलेला ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ हा केवळ धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम नसून तो धर्म आणि राष्ट्र रक्षणाच्या वाटचालातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारताच्या उज्ज्वल भविष्याचा हा शंखनाद आहे. या निमित्ताने सनातन धर्माच्या सेवेसाठी कृतीशील आणि गतीशील होणे, हे एकप्रकारे राष्ट्ररचनेच्या अर्थात् धर्मसंस्थापनेच्या कार्यात सहभागी होणेच आहे. हीच सध्याच्या काळातील साधनाही आहे.
संकलक : श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था
संपर्क क्रमांक: 7775858387