मुंबई, १८ ऑगस्ट – शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत आणि त्यांचा गट काँग्रेसचे बटीक झाले असून, राऊत हे राहुल गांधींचे पगारी नोकर बनले आहेत, असा गंभीर आरोप भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी केला. मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बन म्हणाले की, निवडणूक आयोगाने मतचोरीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. मात्र, काँग्रेसच्या प्रवक्त्यांऐवजी संजय राऊत राहुल गांधींची बाजू मांडतात हे हास्यास्पद आहे. लोकसभेला महाविकास आघाडीला जागा वाढल्या असताना कुणी आक्षेप घेतला नाही. पण विधानसभेला भाजपाला बहुमत मिळताच निवडणूक आयोग व ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
बन यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आठवण करून दिली. “माझी शिवसेना जर काँग्रेससारखी झाली तर दुकान बंद करेन,” हा बाळासाहेबांचा ठाम विचार होता. पण आता राऊत काँग्रेसची वकीली करत आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तपासले पाहिजे की राऊत हे आपल्या पक्षाचे प्रवक्ते आहेत की काँग्रेसचे, असे त्यांनी खोचकपणे म्हटले.
सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या टीकेवरही त्यांनी राऊत यांना धारेवर धरले. “सामना काँग्रेसचे मुखपत्र आहे का?” असा थेट सवाल बन यांनी केला.
यावेळी त्यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी घोषणा झाल्यानंतर उबाठा गटाने अभिनंदन न करता काँग्रेसची भूमिका स्वीकारली, यावरही तीव्र टीका केली.
महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या लंडन दौर्यावर राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना बन म्हणाले की, आशीष शेलार हे रघुजीराजे भोसले यांची तलवार महाराष्ट्रात आणण्यासाठी गेले होते. मराठ्यांच्या इतिहासाचे प्रतीक असलेली तलवार राज्यात आली तर तिचे स्वागत व्हायला हवे. “तुमच्याकडे हिंदुत्व आणि बाळासाहेबांचा स्वाभिमान शिल्लक असेल तर तलवारीचे दर्शन घ्या,” असा इशारा त्यांनी राऊत व आदित्य ठाकरे यांना दिला.