पालघर, ७ ऑगस्ट –
ग्रामविकासाच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी ‘सरपंच संवाद’ हे विशेष मोबाईल अॅप लाँच करण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि जल जीवन मिशन यांसारख्या महत्वाकांक्षी योजनांना पूरक ठरणारे हे अॅप गावागावातील यशस्वी उपक्रमांची देवाणघेवाण आणि संवादासाठी एक प्रभावी डिजिटल मंच ठरेल, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
जलशक्ती मंत्रालयातर्फे आयोजित ‘स्वच्छ व सुजल ग्रामासाठी नेतृत्व’ या कार्यक्रमात जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या हस्ते अॅपचे उद्घाटन करण्यात आले. या अॅपचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामपंचायतीच्या कारभारात संवाद, पारदर्शकता आणि नवोपक्रमांचा प्रसार वाढवणे.
अॅपची वैशिष्ट्ये:
-
सरपंच गावातील यशस्वी उपक्रमांची माहिती इतर गावांपर्यंत पोहोचवू शकतात
-
देशभरातील विविध गावांचे अनुभव, यशोगाथा पाहण्याची सुविधा
-
विविध विषयांवरील ऑनलाइन प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र मिळवण्याची संधी
-
ग्रामविकासाशी संबंधित महत्त्वाच्या बातम्यांची माहिती
अधिकाऱ्यांचे प्रतिपादन:
जिल्हा पाणी स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पारसकर यांनी स्पष्ट केले की, “हे अॅप दोन्ही अभियानांच्या उद्दिष्टांची पूर्तता करणारे एक परिणामकारक साधन ठरेल.”
पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी सर्व सरपंचांना आवाहन केले की, “‘सरपंच संवाद’ अॅप तात्काळ मोबाईलमध्ये डाऊनलोड करा आणि ग्रामविकासाच्या प्रक्रियेत सक्रीय सहभागी व्हा. नियमित वापरातून गावांचा स्वच्छ, सुजल आणि शाश्वत विकास साधता येईल.”