नवी दिल्ली, 14 ऑगस्ट – सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायाधीश एल. नागेश्वर राव यांची बिहार क्रिकेट असोसिएशनचे (बीसीए) लोकपाल म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती असोसिएशनमधील काही अधिकाऱ्यांच्या कथित बेकायदेशीर कारवायांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे.
न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने सांगितले की, सदस्यांमधील वाद किंवा बाह्य हस्तक्षेप टाळून असोसिएशनचे सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. पाटणा उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने माजी न्यायाधीश शैकेश कुमार सिंग यांची लोकपाल म्हणून झालेली नियुक्ती रद्द केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला.
खंडपीठाने स्पष्ट केले की, बीसीसीआयला नवीन लोकपाल नेमण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याअनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायाधीश एल. नागेश्वर राव यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, बिहार क्रिकेट असोसिएशनच्या कार्यपद्धतीबाबत निर्णय घेण्यासाठी दोन्ही पक्षांनी न्यायमूर्ती राव यांच्यासोबत औपचारिक बैठक घेण्याचे निर्देश दिले. मानधनाची रक्कमही दोन्ही पक्षांच्या सल्लामसलतीने ठरवली जाणार आहे.
सुनावणी दरम्यान बीसीएच्या वकिलाने माजी सचिव आदित्य प्रकाश वर्मा यांच्या न्यायालयात हजेरी लावण्याच्या अधिकारावर प्रश्न उपस्थित केला, कारण वर्मा यांना 2023 मध्येच पदावरून काढून टाकण्यात आले होते.