चेन्नई, 20 मे (हिं.स.) : अणुऊर्जा शास्त्रज्ञ एम. आर. श्रीनिवासन यांचे आज, मंगळवारी (20 मे रोजी) तामिळनाडूच्या उटी येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते 95 वर्षांचे होते. त्यांची मुलगी शारदा श्रीनिवासन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर पोस्ट करून ही माहिती दिली.
शारदा श्रीनिवासन यांनी दिलेल्या माहितीनुसार शास्त्रज्ञ एम. आर. श्रीनिवासन सोमवारी अचानक आजारी पडले आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मंगळवारी पहाटे 4 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एम.आर. श्रीनिवासन यांचा जन्म 5 जानेवारी 1930० रोजी ब्रिटिश भारतातील बंगळुरू येथे झाला. त्यांनी म्हैसूरच्या इंटरमिजिएट कॉलेजमधून विज्ञानाचे शिक्षण घेतले. या काळात त्यांनी इंग्रजी आणि संस्कृत ही भाषा माध्यम म्हणून निवडली.
त्यांनी 1950 मध्ये एम विश्वेश्वरय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर, 1952 मध्ये ते पुढील शिक्षणासाठी कॅनडातील मॉन्ट्रियल येथील मॅकगिल विद्यापीठात गेले. येथे त्यांनी गॅस टर्बाइन तंत्रज्ञानात विशेषज्ञता घेऊन पीएचडी केली. सप्टेंबर 1955 मध्ये, श्रीनिवासन अणुऊर्जा विभागात सामील झाले. येथे त्यांनी भारताच्या अणुऊर्जेचे जनक होमी झांगीर भाभा यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली. या दोघांनी ऑगस्ट 1956 मध्ये देशातील पहिली अणुभट्टी ‘अप्सरा’ बांधली.होमी भाभा यांचे 24 जानेवारी 1966 रोजी निधन झाल्यानंतर श्रीनिवासन यांनी विक्रम साराभाई, डॉ. होमी सेठना, डॉ. राजा रामण्णा, डॉ. पी. के. अय्यंगार, डॉ. आर. चिदंबरम आणि डॉ. अनिल काकोडकर यांच्यासोबतही काम केले.
श्रीनिवासन 1987 मध्ये अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष झाले. त्यांनी मुंबई, महाराष्ट्र येथे न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची (एनपीसीआयएल) स्थापना केली. त्यांच्या नेतृत्वाखाली, एनपीसीआयएलने देशात 18 अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले. श्रीनिवासन हे वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूक्लियर ऑपरेटर्सचे (डब्ल्यूएएनओ) संस्थापक सदस्य, इंडियन नॅशनल अकादमी ऑफ इंजिनिअरिंग अँड इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सचे फेलो आणि इंडियन न्यूक्लियर सोसायटीचे एमेरिटस फेलो देखील होते.
——————————-