त्र्यंबकेश्वर, 18 ऑगस्ट – श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन व्यवस्थेत अकस्मात बदल केल्यामुळे निर्माण झालेल्या वादात सुरक्षारक्षकांनी भाविकांना मारहाण केली. या घटनेचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून, भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
श्रावण सोमवार, महाशिवरात्र, शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. गर्दी नियंत्रणासाठी विशेष पोलीस बंदोबस्त असतो. मात्र, ढिसाळ नियोजनामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना अनेकदा अडचणींना सामोरे जावे लागते.
यापूर्वी देवस्थानने ऑनलाइन देणगी दर्शन सुरू केले होते, पण त्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी यावर सूचना केल्या होत्या. तरीही व्यवस्थापनातील त्रुटींमुळे भाविकांचा छळ सुरूच आहे.
सुरक्षारक्षकांकडून भाविकांवर वारंवार अरेरावी होत असल्याच्या तक्रारी येत असून, अनेक भाविक त्रास टाळण्यासाठी दर्शन न घेता परत जात आहेत. या परिस्थितीमुळे नाशिकच्या पर्यटन व्यवस्थेलाही फटका बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे.