अमरावती, 24 एप्रिल (हिं.स.) अचलपूर-चांदूर बाजारचे आमदार प्रवीण तायडे यांनी मंगळवारी २२ एप्रिलला सकाळी तालुका क्रीडा संकुलला भेट दिली. दरम्यान येथील दुर्दशा पाहताच ते क्रीडा अधिकाऱ्यांवर भडकले. त्यांनी फोनवरच संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
या क्रीडा संकुलाच्या अव्यवस्थेबद्दल उपस्थित क्रीडाप्रेमींनी आमदारांपुढे समस्यांचा पाढाच मांडला होता. आमदार प्रवीण तायडे यांनी दिलेल्या या भेटीदरम्यान त्यांनी परिसरातील ट्रॅकची पाहणी केली. या ट्रॅकवर पाहिजे तसा प्रकाश नाही. क्रीडा संकुलातील स्वच्छतागृहात अस्वच्छता होती. परिसरही अस्वच्छ होता. त्यामुळे आमदारांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून धारेवर धरले. क्रीडा प्रेमींनी मांडलेल्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांशी बोलून क्रीडा संकुलात मुलींसाठी चेंजिंग रूम, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था, क्रीडा संकुलमध्ये पथदिवे, गोळा फेकची सोय आदी सुविधा या क्रीडा संकुलमध्ये उपलब्ध करून द्याव्या, याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या वेळी आमदार तायडे यांनी क्रीडा संकुलमधील अर्धवट बांधकाम असलेल्या इमारतीचीही पाहणी केली.
नोकरीसाठी आज शारीरिक दृष्ट्या सुदृढ असणे आवश्यक आहे. यामुळे युवकांचा कल मैदानी खेळाकडे जास्त आहे. शासनाने तालुकास्तरावर क्रीडा संकुलाची सोय केली आहे. यावर दरवर्षी लाखो रुपये खर्च होतात. मात्र तालुकास्तरावर पाहिजे तशा सुविधा क्रीडा विभागाने उभारल्या नाही, त्यामुळे तालुकास्तरावरील क्रीडा संकुलकडे क्रीडा विभागाचे दुर्लक्ष असल्याचे क्रीडा प्रेमींमधून मधून व्यक्त होत आहे. या वेळी आमदार प्रवीण तायडेंसोबत भाजपचे माजी तालुकाध्यक्ष मुरली माकोडे, ग्रामीण तालुकाध्यक्ष रमेश तायवाडे, शहराध्यक्ष टिकू उर्फ आनंद अहिर, मनीष नागलिया, लखन चौधरी, प्रतीक भुसारी यांच्यासह इतर कार्यकर्ते व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.