सोलापूर, 14 जून, (हिं.स.)। जागा मालकास काही रक्कम देऊन जागेची नोटरी केलेल्या सुमारे १५ हजारांहून अधिक जणांनी महापालिकेच्या टॅक्स विभागाकडे नोंद लावून घेतली आहे. मात्र, त्यातील अनेक जागा दुसऱ्यांनाच विकल्याने टॅक्स विभागाची डोकेदुखी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आता नोटरीवरून कोणाचीही नोंद न लावण्याचा निर्णय महापालिकेच्या कर आकारणी विभागाने घेतला आहे. अर्ज करणाऱ्यांच्या जागेवर जाऊन अधिकारी पाहणी करतील आणि तो व्यक्ती त्या जागे राहत असल्याची खात्री करूनच नोंद लावली जाणार आहे.
सोलापूर शहराच्या हद्दवाढ भागात आठ-दहा वर्षांपूर्वी तीन-चार लाखात मिळणाऱ्या एक गुंठे जागेची किंमत सध्या आठ ते १४ लाख रुपयांपर्यंत पोचली आहे. त्यामुळे सुरवातीला मूळ मालकाने चार-लाच लाखात विकलेला तोच प्लॉट दुसऱ्यालाच विकण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे एकाच जागेची नोंद टॅक्स विभागाकडे लावण्यासाठी दोघे-तिघे येत होते. त्यातून वादविवाद वाढले होते आणि महापालिकेच्या टॅक्स विभागासमोरील अडचणी देखील वाढल्या होत्या. त्यामुळे आता नोटरीवरून जागेची टॅक्स विभागाला लावण्याची पद्धत कायमची बंद करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त सचिन ओंम्बासे यांनी घेतला आहे.
—————
