पणजी, ३ मे (हिं.स.) : उत्तर गोव्यातील प्रसिद्ध लइराई देवीच्या मंदिरात यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ३० जण जखमी झाले आहेत. जखमींना गोव्यातील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. चेंगराचेंगरीचे वृत्त मिळताच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत रुग्णालयात पोहोचले. त्यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करत पीडित कुटुंबांचे सांत्वन केले.
गोव्यातील शिरगावात लइराई देवीची विशेषतः पूजा केली जाते. हे स्थानिक लोकांसह जवळच्या भागातील भाविकांसाठी एक महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र आहे. या ठिकाणी मंदिरामुळे दारू आणि अंडी देखील निषिद्ध आहेत. गावात कोणत्याही प्राण्याची हत्या करत येत नाही. या गावात घोडेही येऊ शकत नाहीत. लैराई देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने लोक येतात. या मंदिरात दरवर्षी यात्रा असते. त्यामध्ये सुमारे ४० ते ५० हजार भाविक सहभागी होतात. शुक्रवारी रात्री या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक पोहोचले.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे ३ वाजता ही घटना घडल्याची माहिती आहे. एका ठिकाणी उतार असताना गर्दीतील लोक वेगाने चालू लागली. त्यामुळे गर्दीत गोंधळ निर्माण झाला. पळापळ सुरू झाली आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. तर काहींनी यात्रेदरम्यान आग लागल्याची अफवा परसली आणि लोक इथे-तिथे पळू लागले. त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे. यात्रेदरम्यान गर्दी मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे प्रशासनाकडून काही प्रमाणात नियोजन कमी पडून चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.
चेंगराचेंगरी दरम्यान परिस्थिती अत्यंत भयावह बनली आणि लोक एकमेकांवर पडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.