पुणे , 10 जून (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोमवारी(दि.१०) कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पद सोडण्याची मागणी केली होती. आपल्याला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करावे अशी विनंती जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे केली.जयंत पाटील यांची ही विनंती शरद पवार यांनी मान्य केली आहे.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २६ वा वर्धापनदिन सोमवारी(दि.१०) सोहळा पार पडला. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, “मला शरद पवार यांनी बरीच संधी दिली. प्रदेशाध्यक्ष पदाचा सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. या निमित्ताने तुमच्या सर्वांच्या देखत मी शरद पवार यांना विनंती करतो,” असं जयंत पाटील म्हणाले. त्यानंतर जयंत पाटील यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. शेवटी शरद पवार यांनी निर्णय घ्यावा असंही जयंत पाटील यांनी म्हटलं. त्यानंतर शरद पवार यांनी केलेल्या भाषणात जयंत पाटील यांची विनंती मान्य केली आहे.
जयंत पाटील यांच्या विनंतीवर शरद पवार म्हणाले की, जयंत पाटील यांनी दहा वर्ष संघर्षाचा काळात संघटनेचे काम केले याचा आनंद आहे. त्यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. जयंत पाटील यांनी मला सांगितलं आहे की आता नव्या पिढीला संधी द्या, तुम्ही आणि आम्ही सगळे त्यांच्या मागे उभे राहूयात. पण तुमची मानसिकता वेगळी आहे ते या ठिकाणी दिसलं. मी एवढेच सांगतो की प्रमुख सहकाऱ्यांना एकत्र घेऊन त्यांच्याशी आम्ही या विषयावर सुसंवाद साधू. सामूहिकपणाने या संदर्भातील निर्णय घेऊ.
पुढे ते म्हणाले की, हा निर्णय घेत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवीन चेहरे दिसले पाहिजेत. माझी खात्री आहे की कर्तृत्व असलेले हजारो कार्यकर्ते आज आपल्या पक्षात आहेत. त्यांना संधी देऊया मार्गदर्शन करूया आणि त्यांच्यातून राज्य चालवण्याची कुवत असलेले नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देऊ शकतो हा इतिहास निर्माण करायचा आहे. त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी असली पाहिजे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जोरदार चर्चा सुरु होती. यावरुनच पक्षामध्ये काही प्रमाणात नाराजी असल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर आता जयंत पाटील यांनीच प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली. नव्या चेहऱ्यांना संधी द्या म्हणत जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करण्याची मागणी केली. यावर आता शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्या मागणीवर बोलताना सामूहिकपणाने या संदर्भातील निर्णय घेऊ असं म्हटलं आहे.