मुंबई : राज्यात एकहाती शिवसेनेचा भगवा फडकवण्यास सज्ज राहा, आत्तापासूनच तयारीला लागा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले आहेत. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी हे विधान केलं आहे. उद्धव ठाकरेंच्या या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. भाजपला दूर ठेवण्यासाठी आपण एकत्र आलो आहेत, हे महाविकास आघाडीतील नेत्यांनी विसरू नये, असा मौलिक सल्ला शरद पवारांनी दिला आहे.
शरद पवार म्हणाले की, गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे भाषण ऐकत आलो आहे. प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या विधानावरुन वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. शरद पवार कांदाप्रश्नी नाशिक दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शरद पवार म्हणाले की, शिवसेना स्वबळावर भगवा फडकवणार हे शिवसैनिकांना सांगत असेल. पण हे मी गेल्या 30 वर्षांपासून ऐकत आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्षाच्या नेत्यांना आपला पक्ष मोठं करण्याचं स्वातंत्र्य आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढवाव्या का? हा निर्णय इतर संबंधित पक्ष आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील घेतील. मात्र, भाजपला दूर ठेवण्यासाठी आपण एकत्र आलो आहेत, हे महाविकास आघाडीतील नेत्यांनी विसरू नये. महाविकस आघाडी सरकारला राज्यातील जनतेची पसंती आहे. जनतेच्या भल्यासाठी निर्णय घ्या, असा सल्ला देखील शरद पवार यांनी यावेळी दिला.
तत्पूर्वी, व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुरु असलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन केले. या बैठकीत जिल्हाप्रमुखांनी उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचं कौतुकही केले. जिल्हाप्रमुखांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काम करावं, सध्या आर्थिक निधीची कमतरता आहे मात्र लवकरच यावत तोडगा काढू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी जिल्हाप्रमुखांना दिला. कोविड काळात राज्य सरकारने केलेली काम जनतेपर्यंत पोहचवा. शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला ताकद देण्यात येईल असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
दरम्यान, दसरा मेळाव्यावेळी ऑनलाइन भाषण करताना उद्धव ठाकरेंनी भाजपाचा खरपूस समाचार घेतला होता. माय मरो पण गाय वाचो, असं आमचं हिंदुत्व नाही. इथं गोमाता आणि शेजारच्या गोव्यात खाता. असं आमचं हिंदुत्व नाही. पण घंटा बडवा, थाळ्या वाजवा इतकंच तुमचं हिंदुत्व आहे. फक्त काळ्या टोप्या घालू नका, त्याखाली मेंदू असेल तर विचार करा, असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला होता.