अमरावती, 11 ऑगस्ट –
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांचे अलीकडील विधान हास्यास्पद आणि खरे असल्याचे मत भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केले. निवडणुकीच्या काळात अनेक मांत्रिक-तांत्रिक “मतदार संघ बांधून देऊ, मतदान यंत्रांवर प्रभाव टाकू” अशा दाव्यांसह येतात. असेच लोक पवार आणि उद्धव ठाकरेंकडे गेले असतील, अशी टीका त्यांनी केली.
डॉ. बोंडे म्हणाले की, निवडणूक काळात पैसे कमावणाऱ्या लोकांच्या टोळ्या फिरतात. पवार यांचे संपूर्ण आयुष्य राजकारणात गेले असल्याने त्यांच्याकडेही मतदान यंत्र हॅक करण्याचा दावा करणारे आले असतील. परंतु जागरूक नेत्यांनी अशा लोकांची तक्रार पोलिसांकडे करणे आवश्यक आहे. तेव्हा काहीच न सांगता आता दहा महिन्यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांना पाठिंबा देत पवार बोलत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
संजय राऊत यांच्यावर टीका करताना बोंडे म्हणाले, “रात्री त्यांच्या डोक्यात येणाऱ्या कल्पना सकाळी भोंग्यातून बाहेर पडतात आणि त्यावर माध्यमांमध्ये चर्चा रंगते.” तसेच मतदार याद्यांमधील चुका दुरुस्त करण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष सखोल पडताळणी (एसआयआर)ची तरतूद केली आहे.
राहुल गांधी एकीकडे महाराष्ट्रातील मतांची संख्या वाढल्याचे सांगतात, तर दुसरीकडे मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण न करण्याची मागणी करतात. “नेमके त्यांना काय पाहिजे आहे, हे स्पष्ट नाही. काँग्रेस पक्ष या गोंधळात आहे,” असे बोंडे यांनी सांगितले.