नाशिक, ७ ऑगस्ट –
राज्यातील विरोधी पक्षांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त करण्याची रणनीती भारतीय जनता पार्टीने आखल्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार केला आहे. पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ही घोषणा केली.
मुंबई नाका येथील पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत शिंदे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही, शेतमालाला भाव नाही, आणि राज्य सरकारने दिलेली आश्वासने अपूर्ण आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये लवकरच महामोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.
शिंदे म्हणाले, “राज्यावर कर्जाचा डोंगर आहे. महामार्ग तयार करून विकास होत नाही. पशुखाद्यावर GST लावला जातो, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे सरकारला शेतकऱ्यांची ताकद दाखवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत.”
या बैठकीस उपस्थित असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात सुरू असलेल्या नाराजीची भावना उघडपणे व्यक्त केली. शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेतला. एका कार्यकर्त्याने तर स्पष्ट विचारले की, “पक्षाच्या आंदोलनात किती नेते सहभागी झाले, हे विचारले पाहिजे. कार्यकर्ते फक्त गर्दीसाठी लागतात का?”
शिंदे यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्त्यांनाच संधी देण्यात येईल, असे स्पष्ट केले. “सौभ्यपुरते पदे भोगणाऱ्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवणार,” असा इशाराही त्यांनी दिला.
तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत शिंदे म्हणाले, “महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे, मात्र अंतिम निर्णय मित्र पक्षांशी चर्चा करून घेतला जाईल. तरीदेखील स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी ठेवावी, असे मी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.”