सोलापूर : पंढरपूर पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर पक्षाने पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेतून हाकलपट्टी केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून ही घोषणा करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

* निवडणूक लढविण्यावर ठाम – गोडसे
शैला गोडसे यांच्याशी संपर्क साधला असता शिवसेना महाविकास आघाडीत सामील असल्याने पक्षाची अडचण आपण समजू शकतो, तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे पक्षाच्या कारवाई विरोधात आपण काहीही बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले, मात्र जनतेच्या रेट्यामुळे आपण निवडणूक लढविण्यावर ठाम आसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पंढरपूर पोटनिवडणूक आता दुरंगी न होता शैला गोडसे, स्वाभिमानीचे सचिन शिंदे व अपक्षांमुळे बहुरंगी होण्याची चिन्हे आहेत.

ही पोटनिवडणूक भाजप आणि राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. ही पोटनिवडणूक 17 एप्रिलला होणार असून या निवडणुकीचा निकाल 2 मे रोजी जाहीर करण्यात येईल.
* राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोडला सुटकेचा निश्वास
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजपची प्रतिष्ठेची लढाई ठरत आहे. तर त्याचवेळी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्याने राष्ट्रवादीविरूद्ध बंडखोरी केली आणि भगीरथ भालके यांच्याविरूद्ध उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्व अलबेल आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.

शिवसेनेने राष्ट्रवादीविरूद्धच बंड केलं की काय? अशी चिंता व्यक्त केली जात होती. परंतु शिवसेनेनं लगेच शैला गोडसे यांच्या हाती नारळ दिला आणि पक्षातून काढून टाकलं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
महाविकास आघाडीच्या सर्व घटकांचा भगीरथ यांना आशीर्वाद लाभला आहे. जेव्हापासून महाविकास आघाडी आली आहे तेव्हापासून भाजपला कुठेही विजय मिळवता आला नाही. सगळे एकत्र आले की भाजपचा पराभव होतो, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं.
