नांदेड, 13 सप्टेंबर। हैद्राबाद गॅझेटिअर नुसार (1920) मराठवाड्यातील बंजारा (लमाण) समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून आरक्षणाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी केली आहे.
मराठवाड्यातील बंजारा (लमाण) समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करून आरक्षणाचा लाभ देण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मराठवाडा हा प्रदेश सन 1948 पर्यंत निजामशाहीतील हैद्राबाद राज्याचा भाग होता. त्या काळातील हैद्राबाद स्टेट गॅझेटिअर सन 1920 मध्ये लांबडा/बंजारा (सुगळी) समाजाचा स्पष्ट उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून करण्यात आलेला आहे. हा समाज मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास असून ऐतिहासिक, सामाजिक सांस्कृतिक दृष्टया त्यांचा आदिवासी समाजात समावेश असल्याचे गॅझेट मध्ये स्पष्ट नोंदविले आहे.
ऐतिहासिक पुराव्यानुसार बंजारा समाज असून प्रशासकीय नोंदणीमध्ये त्यांना जमातीचा दर्जा मिळालेला आहे. तथापि सन 1956 नंतर मराठवाडा विभाग महाराष्ट्रात सामील झाल्यावर या समाजाला ओबीसी/एनटीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले. परंतु याच गॅझेटचा आधार घेऊन आंध्रप्रदेश व तेलंगाना राज्यात बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत (ST) प्रवर्गात मान्यता देण्यात आली आहे.