शॉक बसून द.सोलापूर तालुक्यातील मुस्तीच्या तरूणाचा मृत्यू
महावितरणचा वायरमन खालीच थांबला
गावातला खाजगी लाईनमन वर चढला
फोटो मेलवर-सचिन राठोड
सोलापूर -विशेष प्रतिनिधी
सोलापूर-हैदराबाद रस्त्यावरील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावात शुक्रवारी एक धक्कादायक घटना घडली.गावात एक तरूण रोजगार मिळावा म्हणून खाजगीरित्या लाईनमनचे काम करत होता. दुपारी तो घरात जेवत बसला होता. तितक्यात महावितरणचा अधिकृत वायरमन त्याच्या घरी आला.डीपी दुरूस्त करायला जायचे आहे,माझ्यासोबत चल,असे त्याने म्हटल्यानंतर तो जेवण सोडून ताडकन निघाला. दोघेही डीपीकडे गेले.कुमार तानाजी घाडगे वय 24 रा.मुस्ती हा खाजगी लाईनमन डीपीवर चढला तर महावितरणचा वायरमन देवीदास जमादार रा.सोलापूर हा खालीच थांबून राहिला.डीपी दुरूस्ती करत असताना विजेचा जबर शॉक लागल्याने कुमार हा डीपीवरच लटकतच मरण पावला. दुपारी भर उन्हात अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.कुमारचा मृत्यू झाल्यानंतर देवीदास याने तेथून पळ काढला.
झाले असे की,मुस्ती येथील शेतकरी राचप्पा बचाटे यांच्या शेतातील डीपी दुरूस्तीचे काम होते. मुस्तीच्या जवळच असलेल्या संगदरी गावाची यात्रा होती. त्यामुळे मुस्ती आणि संगदरी डीपीवरून वीजपुरवठा सुरू होता. कुमार हा डीपीवर चढण्यापूर्वी मुस्तीचा वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. दुरूस्तीचे काम करताना संगदरीच्या सेक्शनमधून कुमार विजेचा शॉक बसला.संगदरीच्या सेक्शनमध्ये वीज पुरवठा सुरूच होता. हे या घटनेनंतर कळाले.
संगदरी आणि मुस्ती शेती शिवार्यात असणार्या वीज पुरवठ्याच्या डीपीमध्ये बिघाड झाला होता.वास्तविक पाहाता त्याची दुरूस्ती देवीदास याने करावयास हवी होती. मात्र त्याने गावात वीज दुरूस्तीची कामे करणारा कुमार याला बोलावून घेतले. दुरूस्तीसाठी पोलवर चढून काम करणे गरजेचे होते. देवीदास याला वरती चढणे शक्य नव्हते, त्यामुळे जमादार याने नेहमी लाईनमनचे काम करणार्या कुमार यास घरी जावून बोलावून आणले.
लाईट बंद आहे याची खात्री न करता जमादार यांनी घाडगे यास पोल वरती चढवले, अशी मुस्तीच्या ग्रामस्थांची तक्रार आहे. संगदरी या गावची यात्रा असल्याने संगदरीकडे जाणारी लाईन सुरूच होती. हे जमादार यास माहीत नव्हते. वायरमन जमादार याने मुस्ती येथील लाईट बंद करून कामासाठी घाडगे यास पोल वरती चढवले. परंतु संगदरीची वीज सुरू होती.
– घरी जेवत बसला होता,
प्रत्यक्षात तो काळच बनला…
मुस्तीसह परिसरातील गावात कुमार हा वायरमनची कामे करत असत.दुपारी तो घरात जेवत बसला होता. जमादार लाईटच्या दुरूस्ती कामासाठी कुमारला नेहमी न्यायचा. त्यानुसार शुक्रवारी दुपारी तो कुमारच्या घरी गेला. जेवत असतानाच जमादारचे बोलावणे आल्यानंतर तो लागलीच उठला आणि डीपी दुरूस्तीसाठी त्याच्यासोबत गेला. क्षणात कुमारचे होत्याचे नव्हते झाले. जमादार हा काळ बनूनच त्याच्या घरी गेला होता की काय,अशी चर्चा मुस्ती गावात ऐकायला मिळाली.
मुस्ती आणि संगदरी या दोन्ही गावाची लाईन ही एकच आहे. ज्या ठिकाणी काम लाईन दुरूस्तीचे काम सुरू होते तेथे दोन्ही लाईन सुरू होते. शुक्रवारी संगदरी गावाची यात्रा असल्याने या गावची लाईन सुरूच होती. कामे करीत असताना लाईट बंद असल्याची खात्री करून घ्यावी लागते. जमादार याने मुस्ती लाईन बंद केली. परंतु संगदरी लाईन बंद केल्याची खात्री न करता घाडगे यास पोलावर चढविले. परिणामी कुमार याला आपला जीव गमवावा लागला.
– उदरनिर्वाहसाठी करीत होता लाईनमनचे काम
कुमार घाडगे हा अविवाहित युवक आपले आई वडील व दोन मोठ्या भावांसोबत राहत होता. आपले दैंनदिन गरजा पूर्ण करण्यासाठी घाडगे हा वायरमन जमादार यांच्या सोबत लाईनमन म्हणून काम करत होता. परंतु हेच कर्तव्य त्याच्यासाठी काळ बनून आले.
कुमार हा शेतातील कामे करता करता तो वायरमन नसताना देखील वायरमन जमादार सोबत इलेक्ट्रीकची कामे करत होता. आज दुपारी तो घरी जेवण करत असताना जमादार त्याला कामासाठी बोलावल होते. पोलवर चढून तो काम करताना आज अशी घटना त्याच्या सोबत घडली.
अनिल मुरडे – मुस्ती
हा प्रकार समजातच ग्रामस्थ घटनास्थळी आले.त्यापाठोपाठ महावितरणचे अधिकारी व कर्मचारी आणि पोलीस आले.वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस एस.बी.चव्हाण यांनी डीपीवर लटकलेल्या कुमारचा मृतदेह खाली आणला व शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात पाठवला.दिवसभर महावितरणच्या संबंधित अधिकार्यांशी संपर्क साधून याबाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न सुराज्यच्या प्रतिनिधीने केला पण एकानेही फोन उचलला नाही.रात्री हाती आलेल्या माहितीनुसार जमादार हा पोलीस चौकीत हजर झाल्याची प्राथमिक माहिती होती.त्याच्यावर आता कोणती कारवाई होणार याकडे लक्ष लागून आहे.
आता जबाबदार कोण?
सर्रास ग्रामीण भागात महावितरणचे कर्मचारी स्थानिक वायरमनची मदत घेत असतात.सरकारचा गलेलठ्ठ पगार महावितरणच्या वायरमनने उचलायचा.आकडा टाकून वीज घेणार्यांची चिरीमिरी वेगळीच.असे असताना गावातील वायरमन यांना कामासाठी बोलावणे किंवा सतत मदतीला बोलावणे कितपत योग्य आहे.मुस्तीच्या कुमार या तरूणाचा हाकनाक जीव गेला.त्याची जबाबदारी कोणावर.त्याच्या कुटुंबियाला महावितरण मदत करणार काय,असे प्रश्न विचारले जावू लागले आहेत.