ओटावा, 8 ऑगस्ट – कॅनडातील सरे शहरातील प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेमध्ये पुन्हा एकदा गोळीबार झाला आहे. हा दुसरा हल्ला असून याची जबाबदारी गोल्डी ढिल्लन आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली आहे. तसेच कपिलला मुंबईत हल्ला करण्याची धमकीही देण्यात आली आहे. कपिल शर्माकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. यापूर्वी १० जुलै रोजीही त्यांच्या कॅफेवर गोळीबार झाला होता.
सोशल मीडियावर समोर आलेल्या ९ सेकंदांच्या व्हिडिओत कारमधून आलेल्या काही व्यक्तींनी कॅफेकडे १२ हून अधिक राउंड गोळीबार केल्याचे दिसते. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
गोल्डी ढिल्लनने सोशल मीडियावर पोस्ट करून हल्ल्याची जबाबदारी घेतली. त्याने सांगितले की, कपिलला फोन केला असता प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून ही कारवाई केली. तसेच पुढील कारवाई मुंबईत करण्याची धमकी दिली. यापूर्वीच्या हल्ल्याची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंह लड्डीने घेतली होती, जो एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड यादीत असून बीकेआयशी संबंधित आहे.