बँकॉक, 28 जुलै – थायलंडची राजधानी बँकॉकमधील लोकल फ्रेश फूड मार्केटमध्ये रविवारी सकाळी एका हल्लेखोराने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बाजारातील चार सुरक्षा रक्षक, एक महिला आणि गोळीबार करणारा हल्लेखोर यांचा समावेश आहे. हल्लेखोराने नंतर स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली.
या घटनेत कोणताही पर्यटक जखमी झाला नसल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे. या सामूहिक हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बांग सु जिल्हा पोलीस उपप्रमुख वोराफत सुकथाई यांनी हल्लेखोराचे उद्दिष्ट काय होते, याचा शोध घेतला जात असल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे, थायलंड–कंबोडिया सीमेवर सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीशी या घटनेचा काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
थायलंडमध्ये यापूर्वीही अशा घटना
थायलंडमध्ये याआधीही गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. मे 2025 मध्ये यू थोंग जिल्ह्यात एका 33 वर्षीय व्यक्तीने केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये दोन महिला आणि एक पुरुष होता.
तसेच ऑक्टोबर 2023 मध्ये बँकॉकच्या प्रसिद्ध सियाम पॅरागॉन मॉलमध्ये 14 वर्षीय मुलाने गोळीबार केल्याने दोघांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते.