लाडक्या विठुरायाच्या दर्शनाचे भाविकांमध्ये वाढते आकर्षण
ऑनलाईन पूजा नोंदणीचा बोर्ड काही तासातच झळकला हाऊसफुल्ल,
पहिल्याच दिवशी बुकिंगमधून मंदिर समितीच्या पेटीत पाऊण लाख
पंढरपूर : दक्षिण काशी पंढरीतील लाडक्या विठुरायाच्या दर्शनाचे भाविकांमध्ये वाढते आकर्षण दिसत आहे. त्याचा प्रत्यय मंगळवार (ता.25) आला. ऑनलाईन पूजा नोंदणीचा बोर्ड काही तासातच हाऊसफुल्ल म्हणून झळकला. पहिल्याच दिवशी बुकिंगमधून मंदिर समितीच्या पेटीत पाऊण लाख आले. विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजा नोंदणीस देशभरातील भाविकांनी भरघोस प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं. पहिल्याच दिवशी काही तासातच श्री विठ्ठलाच्या नित्यपूजा आणि चंदनउटी पूजा नोंदणी फुल्ल झाली आहे. यातून मंदिराला जवळपास 75 लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, चंदनउटी पूजा इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. दि. 01 एप्रिल ते 31 जुलै, 2025 या कालावधीतील पुजांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणीची सुरवात 25 मार्च रोजी सकाळी 11.00 पासून करण्यात आली होती. त्यास भाविकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून, पहिल्याच दिवशी काही तासातच श्री विठ्ठलाच्या नित्यपुजा आणि चंदनउटी पुजेची नांदणी पूर्ण झाल्याची माहिती मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
यापूर्वी पहिल्या टप्प्यात दि. 7 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2024 व दुसर्या टप्प्यात दि.1 जानेवारी ते 31 मार्च 2025 या कालावधीतील व आता तिस-या टप्प्यात दि. 01 एप्रिल ते 31 जुलै, 2025 या कालावधीतील श्रींच्या सर्व पूजा भाविकांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणीस उपलब्ध करून दिल्या होत्या. या तिसर्या टप्प्यामध्ये आपल्या राज्याच्या विविध कानाकोपर्यातून आणि देशभरातून कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातील भाविकांनी पूजेची नोंदणी केली आहे.
त्यामध्ये श्री विठ्ठलाच्या नित्यपुजा व चंदनउटी पुजा फुल्ल झालेल्या आहेत. याशिवाय, रूक्मिणीमातेच्या नित्यपुजा व चंदनउटी पुजा अनुक्रमे 62 व 18 तसेच पाद्यपुजा 240 व तुळशी अर्चन पुजा 90 बुकींग झालेल्या आहेत. यामधून मंदिराच्या खजिन्यात जवळपास 75 लाख रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे .
असे आहेत पूजांचे दर…
श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेच्या नित्यपूजेसाठी अनुक्रमे रुपये 25 हजार, रू.11 हजार तसेच पाद्यपूजेसाठी रुपये 5 हजार व तुळशी अर्चन पूजेसाठी रू.2100 तसेच श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेच्या चंदनउटी पूजेसाठी अनुक्रमे रु.21 हजार, रू.9 हजार इतके देणगी मुल्य आहे.