नवी दिल्ली, 19 ऑगस्ट – आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देऊन परतलेले भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत अंतराळातील अनुभवांसह विविध विषयांवर चर्चा झाली.
शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरले आहेत. ते २५ जून २०२५ रोजी अॅक्सिओम-४ मोहिमेअंतर्गत अवकाशात गेले होते. त्यांनी १८ दिवस अंतराळ स्थानकात मुक्काम केला आणि १५ जुलै रोजी परतले.
भेटीत पंतप्रधान मोदींनी त्यांना दिलेल्या “गृहपाठा”बाबत विचारले असता शुक्ला यांनी हसत सांगितले की त्यावर चांगले काम झाले असून लोक अभिमानाने याची चर्चा करत आहेत. त्यांनी हे अभियान फक्त सुरुवात असल्याचे सांगून भविष्यासाठी महत्त्वपूर्ण अनुभव मिळाल्याचे नमूद केले.
मोदी म्हणाले की, भारताकडे नेहमीच तयार असलेली ४०–५० अंतराळवीरांची टीम असावी. त्यांनी शुक्लांच्या अनुभवाचा गगनयान आणि इतर अंतराळ मोहिमांमध्ये मोठा उपयोग होईल असे सांगितले. शुक्ला यांनी केंद्र सरकारकडून सातत्याने दिल्या जाणाऱ्या निधी आणि समर्थनामुळे भारत या क्षेत्रात आघाडी घेऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला.
पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’वर शुक्ला यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो शेअर करत लिहिले की, “शुभांशू शुक्ला यांच्याशी विज्ञान, तंत्रज्ञानातील प्रगती आणि भारताच्या गगनयान मोहिमेसह अनेक विषयांवर चर्चा झाली. भारताला त्यांच्या कामगिरीचा अभिमान आहे.”
यापूर्वीही मोदींनी शुक्ला यांच्याशी बोलून त्यांचा प्रवास भारतीयांसाठी एका नवीन युगाची शुभ सुरुवात असल्याचे सांगितले होते.