गॅंगटोक,12 सप्टेंबर : सिक्कीम राज्यात निसर्गाचा आणखी एक घातक तांडव पाहायला मिळाला आहे. पश्चिम सिक्कीममधील यांगथांग विधानसभा मतदारसंघातील अपर रिंबी भागात सोमवारी मध्यरात्री भीषण भूस्खलन झाले. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण अजूनही बेपत्ता आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, भूस्खलनाची तीव्रता इतकी होती की तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिस व एसएसबी जवानांनी बचावकार्य राबवले आणि दोन महिलांना जखमी अवस्थेत सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र त्यापैकी एक महिलेचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला, तर दुसरीची प्रकृती गंभीर आहे.
बचावकार्यात सहभागी असलेल्या पथकाने पुरग्रस्त ह्यूम नदीवर झाडांची लाकडी पूल उभारून पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले.पश्चिम सिक्कीमचे पोलीस अधीक्षक गेजिंग शेरिंग शेरपा यांनी सांगितले की, तातडीने रुग्णवाहिका व वैद्यकीय मदतीद्वारे जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र परिस्थिती अत्यंत बिकट असून बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे.या घटनेने संपूर्ण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून स्थानिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
