गंगटोक, 2 जून (हिं.स.)।ईशान्य भारतातील राज्यांमध्ये पाऊस आणि भूस्खलनाने हाहाकार माजवाला आहे.सिक्कीममधील एक लष्करी छावणीत रविवारी (दि.१) संध्याकाळी भूस्खलन झाले.यामध्ये काही सैनिकांसह ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर ९ जवान बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी(दि.१) संध्याकाळी ७ वाजता उत्तर सिक्कीममधील चट्टन येथील लष्करी छावणीत भूस्खलन झाले. यामुळे आजूबाजूच्या परिसरात बांधलेल्या घरांचे मोठे नुकसान झाले. या भूस्खलनात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक लोक बेपत्ता आहेत. मृतांची ओळख पटविण्यासाठी आणि बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी मोहीम रबवली जात आहे.
उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, लोचन आणि लाचुंग भागात सुमारे १५०० पर्यटक अडकले आहेत. मंगन जिल्ह्याचे एसपी सोनम देचू भुतिया म्हणाले की, ११५ पर्यटक लाचेनमध्ये आणि १,३५० पर्यटक लाचुंगमध्ये राहत आहेत. भूस्खलनामुळे दोन्ही बाजूंनी रस्ते बंद करण्यात आले आहेत. सर्व पर्यटकांना सध्या त्यांच्या हॉटेलमध्येच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.