क्लासरूम घोटाळा प्रकरणी दाखल झाला गुन्हा
नवी दिल्ली, 30 एप्रिल (हिं.स.) : दिल्लीतील मद्य धोरण घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन पुन्हा एका नवीन अडचणीत सापडले आहेत. क्लासरूम घोटाळ्याप्रकरणी या दोन्ही नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या भ्रष्टाचार विरोधी शाखेने (एसीबी) सरकारी शाळांमध्ये नवीन वर्गखोल्या बांधण्यात 2 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.
आम आदमी पार्टी सरकारच्या काळात 12,748 वर्गखोल्या/इमारतींच्या बांधकामात 2 हजार कोटी रुपयांचा मोठा घोटाळा उघडकीस आल्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) निवेदनात म्हटले आहे. वर्गखोल्या बांधण्यासाठी मूळ खर्चापेक्षा पाचपट जास्त पैसे खर्च झाले. त्यांनी 34 कंत्राटदारांना काम दिले, त्यापैकी बहुतेक आम आदमी पक्षाशी संबंधित होते. हा प्रकल्प जून 2016 पर्यंत पूर्ण होणार होता, परंतु या प्रकल्पाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, 12,748 वर्गखोल्या अधिक पैसे खर्च करून बांधण्यात आल्या. एसपीएस (सेमी पर्मनंट स्ट्रक्चर) चे आयुष्य फक्त 30 वर्षे आहे तर आरसीसीचे आयुष्य 75 वर्षे आहे. मात्र आरसीसीच्या खर्चामध्ये एसपीएस वर्गखोल्या बांधण्यात आल्या. या कामासाठी योग्य प्रक्रिया न राबवता आर्किटेक्टची नियुक्ती करण्यात आली. मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्यावर सीव्हीसी (केंद्रीय दक्षता आयोग) च्या अहवालात प्रकल्पातील अनेक अनियमितता उघडकीस आल्या होत्या, परंतु हा अहवाल तब्बल 3 वर्षे दाबून ठेवण्यात आला होता.