लासलगाव, 20 ऑगस्ट – बांगलादेशने कांद्याच्या आयातीवरील बंदी उठवल्यानंतर आशियातील सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात किंचित सुधारणा झाली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या अपेक्षेइतकी दरवाढ झालेली नसल्याने त्यांच्यात नाराजी दिसून येत आहे.
सध्या बांगलादेशने मर्यादित प्रमाणातच कांद्याची आयात सुरू केली असून, तेथील साठा संपल्यानंतर भारतीय कांद्याच्या निर्यातीला गती मिळेल, अशी निर्यातदारांची अपेक्षा आहे. सध्या फक्त 200 टन कांदा पाठवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र केंद्र सरकारकडून प्रोत्साहन न मिळाल्यास दरात मोठा फरक पडणे कठीण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मंगळवारी लासलगाव बाजार समितीत 17,500 क्विंटल कांद्याची आवक झाली. याला किमान 700 रुपये, कमाल 1,801 रुपये आणि सरासरी 1,640 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर मागील आठवड्यात शनिवारी 8,624 क्विंटल कांदा आला होता, तेव्हा सरासरी दर 1,575 रुपये होता. म्हणजेच सरासरी दरात फक्त 65 रुपयांची वाढ झाली आहे.
बांगलादेश हा भारतीय कांद्याचा सर्वात मोठा खरेदीदार असून, भारतातून दरवर्षी निर्यात होणाऱ्या कांद्यापैकी सुमारे 20 टक्के कांदा तिथे जातो. यावर्षी बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने फेब्रुवारीपासून निर्यात ठप्प झाली होती. आता मात्र साठा कमी झाल्याने त्यांनी पुन्हा आयातीस परवानगी दिली आहे, पण निर्यात वाढीस गती मिळायला 15-20 दिवस लागू शकतात.
कांदा निर्यातदार अफजल शेख यांनी सांगितले की, “केंद्र सरकारने निर्यातदारांना प्रोत्साहन न दिल्यास कांद्याच्या दरात मोठी सुधारणा होणे कठीण आहे.” तर शेतकरी संतोष पानगव्हाणे यांनी म्हटले की, “सध्या मिळणारा दर उत्पादन खर्चही भागवत नाही. केंद्र सरकारने तातडीने निर्यातीस प्रोत्साहन द्यावे, जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य दर मिळेल.”
