सोलापूर, 28 एप्रिल (हिं.स.)।
होटगी रोड येथील राज्य विमा कामगार सोसायटीच्या रुग्णालयात बालरोग, स्त्रीरोग, अस्थीरोगसह आदी विभागात करार पद्धतीने 15 तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे येथे उपचारासाठी येणार्या बाह्य व आंतर रूग्णालयात दाखल रुग्णांंची गैरसोय दूर झाली आहे.
येथील विमा रुग्णालयात दररोज बाह्य रुग्णालयात रुग्ण ये-जा करतात. तसेच आंतर रूग्णालयातही रुग्णांवर नियमित उपचार केले जातात. रोज शेकडो रुग्णांची येथे ये-जा असते. शहर जिल्ह्यातील साखर कारखाने, सूत गिरण्याशिवाय विविध लहान-मोठ्या कंपन्यात काम करणार्या कामगारांची संख्या मोठी आहे.
राज्य विमा सोसायटीचे येथील रुग्णालयाशी संलग्नित कार्डधारकांची संख्या 45 हजारांच्या जवळपास आहे. तसेच, धाराशिव आणि लातूर येथीलही कांंही रुग्ण उपचारासाठी येथे दाखल होतात. रूग्णांची संख्या खूप मोठी आहे.