सोलापूर, 20 एप्रिल (हिं.स.)
पुणे विभागातील पाच जिल्ह्यांपैकी चार जिल्ह्यातील 89 गावातील एक लाख 63 हजार लोकांना शंभर टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वाधिक टँकर हे सातारा जिल्ह्यात असून, काही दिवसात पुणे विभागातील गावांमध्ये टँकरची मागणी वाढणार आहे.
वाढत्या उन्हामुळे पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे शेकडो पाण्याचे स्त्रोत आटत असल्याने टँकरने पाणीपुरवठा होत आहे. पुणे विभागातील कोल्हापूर जिल्हा वगळता इतर चार जिल्ह्यात शंभर टँकरने पाणीपुरवठा होत आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 31, सातार्यात 53, सांगली येथे 11 आणि सोलापूर जिल्ह्यात पाच असे एकूण 100 टँकरने पाणीपुरवठा 89 गावे, 617 वाड्या, वस्त्यामध्ये टँकर सुरु आहेत. यामध्ये 17 शासकीय टँकर, 83 खाजगी टँकरचा समावेश आहे.
दरम्यान सोलापूर जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा कमी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या फक्त पाच टँकरने पाणीपुरवठा होत असून, आणखी 25 टँकर देण्याची मागणी करण्यात आली आहे. गतवर्षी जिल्ह्यातील बर्याच तालुक्यात चांगला पाऊस पडल्याने माळशिरस तालुका वगळता इतर दहा तालुक्यात एकही पाण्याचा टँकर सुरू नाही. त्यामुळे इतर जिल्ह्याच्या तुलनेत सोलापुरात कमी टँकर सुरू आहेत.