सोलापूर, 14 ऑगस्ट – एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या अहवालानुसार राज्य शासनाकडून ३२,७६१ बाधित शेतकऱ्यांसाठी ४० कोटी ८७ लाख ९५ हजार ७५५ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तहसील पातळीवर बाधित शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू असून, लवकरच ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
एप्रिल महिन्यात ३२१ शेतकऱ्यांच्या २०७.७५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते, ज्यासाठी ४४ लाख ५० हजार रुपयांची भरपाई मिळाली. मे महिन्यात २१,९८९.१२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान होऊन ३२,४४० शेतकरी बाधित झाले, त्यांना ४० कोटी ४३ लाख ४५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. या दोन्ही महिन्यांतील एकत्रित भरपाईची रक्कम ४० कोटी ८७ लाख ९५ हजार रुपये आहे.