सोलापूर, 25 जून, (हिं.स.)। अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय बनलेल्या शहरातील दोन उड्डाणपूलांसाठी 821 कोटी पाच लाखांची निविदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने प्रसिद्ध केली आहे. ऑनलाईन निविदा प्रक्रियेस सहभागासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे. आठ ऑगस्टला निविदा उघडण्यात येणार आहे.दरम्यान, या उड्डाणपुलासाठी महापालिकेने फेज वनची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केली आहे. फेज टू च्या प्रक्रियेस गती दिली आहे. यामध्ये बाधित होणार्या मिळकतीच्या भूसंपादनासाठी 106 कोटी लागणार आहेत.
महापालिकडे भूसंपादनासाठी आवश्यक निधी उपलब्ध असल्याने निविदा काढल्याने दोन उड्डाणपुलांचा विषय लवकर मार्गी लागणार आहे. गेल्या आठ वर्षांपासून उड्डाणपुुलाचे काम रखडले होते. आ. देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत आवाज उठवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातले. पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. विजयकुमार देशमुख यांनी महापालिका आयुक्तांसमवेत बैठका घेऊन भूसंपादन प्रक्रियेस गती दिली. निविदेमध्ये सहभागी होण्यासाठी सात ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे.
—————