सोलापूर, 3 एप्रिल (हिं.स.)।
सोलापुरात छत्रपती संभाजी तलावात थापट्या पक्षी आढळून आला. या परदेशी पक्ष्यांचा परतीचा प्रवास सुरू झाल्याने तो आढळून आला आहे. छत्रपती संभाजी तलावात वन्यजीव छायाचित्रकार संदीप सरवदे पक्षी व प्राणी निरीक्षण करत असताना व छायाचित्रे काढत असताना तब्बल ३ तासांच्या प्रतीक्षेनंतर तलावात एक वेगळा असा बदक आढळून आला.त्याला मराठीमध्ये थापट्या बदक असे म्हणतात. विशेष म्हणजे हा बदक हिवाळ्यात भारतात स्थलांतरित करत येतो. हा पक्षी बदकापेक्षा मोठा असतो.
या पक्ष्याचे डोके व मान चमकदार काळपट हिरवी असून छातीचा रंग पांढरा शुभ्र आहे. बाकीचा खालील भाग तांबूस असतो. हे पक्षी जास्तीत जास्त भारत, श्रीलंका आणि मालदीव बेटात हिवाळी पाहुणे असतात. हे पक्षी आर्क्टिक प्रदेशात देखील आढळतात. सरोवरे आणि झिलाणी येथील उथळ पाण्यात यांचा वावर असतो. किडे, अळ्या, जंत, लहान बेडूक, शंख शिंपले, लहान मासे आणि सर्व प्रकारच्या बिया आणि पाण्यातील गवतांचे अंकुर इत्यादी त्यांचे खाद्य असते.