सोलापूर, 4 एप्रिल (हिं.स.)।
शेअर मार्केटच्या आमिषातून ४२ लाख १० हजार रुपयास फसलेल्या मंद्रूपच्या तरुण व्यावसायिकास सोलापूर ग्रामीण पोलिसांनी चार महिने तपास करून ती रक्कम परत मिळवून दिली. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर यांनी त्या तरुणास तेवढ्या रकमेचा धनादेश दिला.
शेअर मार्केटबद्दल माहिती असलेल्या फिर्यादी तरुणाच्या मोबाईलवर सप्टेंबर २०२४ मध्ये मोतीलाल ओस्वाल इन्वेस्ट क्लबच्या नावाची लिंक आली. सायबर गुन्हेगारांनी बनावट लिंक पाठविल्याची माहिती नसलेल्या तरुणाने सायबर गुन्हेगारांच्या बनावट व्हॉट्स ॲप ग्रूपवरील चर्चा पाहून एकाच महिन्यात थोडेथोडे करून तब्बल ४२ लाख रुपये गुंतवले.
फिर्यादीस गुंतवलेल्या रकमेवर एक कोटी २० लाखांचा परतावा मिळणार असे व्हर्च्युअली दिसत होते. तेवढी रक्कम परत मिळावी म्हणून तरुणाने रक्कम गुंतवणे बंद केले. त्यावेळी जादा पतरावा सोडा स्वत: गुंतवलेल्या रकमेतील एक रुपयाही परत मिळाला नाही. त्यानंतर तरुणाने मंद्रूप पोलिसांत फिर्याद दिली. तो गुन्हा पुढे सोलापूर तालुका पोलिसांत वर्ग झाला. फिर्यादीने पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन हकिकत सांगितली.