सोलापूर, 11 जून, (हिं.स.)। जमिनीच्या वाटणीवरून पुतण्याला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दक्षिण सोलापूर काँगे्रसचे तालुकाध्यक्ष हरिष गुरूनाथ पाटील आणि त्यांचा मुलगा विकास हरीष पाटील यांच्या विरोधात विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जुळे सोलापुरातील रेणुका नगर येथे हरिष पाटील हे राहतात. जमिनीच्या वाटणीवरून त्यांच्या घरी रात्री त्यांचे भाऊ सुरेश पाटील यांचा मुलगा विनोद पाटील यांच्यासोबत वाद सुरू होता. रात्री साडेअकराच्या सुमारास हा वाद विकोपाला गेला. त्यानंतर हरिष पाटील आणि विकास पाटील यांनी विनोद यास मारहाण केली.
विनोद याचे लिव्हरचे ट्रान्सप्लांट झाले आहे. तरी त्यांच्या पोटात लाथ मारली. त्यांचा मोबाईलही फोडला. जमिनीची वाटणी आणि जागेचे मिळालेले पैसे यावरून बापलेकांनी विनोद यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद विनोद यांनी विजापूर नाका पोलिसात दिली. त्यानुसार हरिष पाटील आणि विकास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.