सोलापूर, 24 एप्रिल (हिं.स.)।
मजूर सहकारी संस्थेच्या विरोधात आलेल्या तक्रारीचा अहवाल सकारात्मक देण्यासाठी सोलापुरातील उपलेखापरीक्षकाने पंचवीस हजार रुपये लाचेची मागणी करून पहिला हफ्ता म्हणून दहा हजाराची लाच स्वीकारताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. शिवाजी गंगाधर उंबरजे (वय ५७, रा. यशवंत हाउसिंग सोसायटी, कुमठा नाका सोलापूर) असे लाच स्वीकारलेल्या लोकसेवकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बोरामणी (ता. द. सोलापूर) येथील विलासराव देशमुख मजूर सहकारी संस्था मर्यादित कार्यरत आहे. तक्रारदार हे त्या संस्थेचे माजी चेअरमन होते. सध्या सदर संस्थेचे चेअरमन हे तक्रारदार यांची पत्नी आहेत. संस्थेचे विरुद्ध सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दक्षिण सोलापूर येथे तक्रारी अर्ज प्राप्त झाल्याने लोकसेवक उंबरजे यांना संस्थेची पाहणी करून अहवाल सादर करण्याबाबत आदेश दिला होता.